सावळेद्वार ते जाळीचा देव दांडीयात्रेला भक्तीचा महासागर; श्री चक्रधर स्वामी यात्रा महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ”



प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे..


सोयगाव तालुक्यातील पवित्र व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र सावळेद्वार ते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव (जायचा देव) या महानुभाव संप्रदायातील श्रद्धास्थानांदरम्यान होणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यात्रा महोत्सवाला मोठ्या भक्तीभावात आणि जल्लोषात सुरुवात झाली आहे. २८ जानेवारी पासून सुरुवात झाली असून ती ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा दांडीयात्रा महोत्सव पार पडणार आहे.

महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी १३व्या शतकात महाराष्ट्रात भक्ती, समता आणि आचरणाधिष्ठित धर्माचा संदेश दिला. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि कर्मकांड यांना विरोध करत साधेपणा, सदाचार आणि ईश्वरभक्ती यांचा मार्ग दाखविला. त्यांच्या कार्याचा ठसा मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात आजही दृढपणे उमटलेला दिसून येतो. सावळेद्वार आणि जाळीचा देव ही स्थळे त्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी मानली जातात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडीयात्रा महोत्सव व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक, संत-महंत आणि वारकरी या यात्रेत सहभागी होत असून संपूर्ण परिसर ‘जय श्री चक्रधर’च्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. मंदिर परिसरात धार्मिक कीर्तन, प्रवचन, नामस्मरण आणि पारंपरिक भजनांचा अखंड कार्यक्रम सुरू आहे.

दिनांक १ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी सायंकाळी ८ वाजता, माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त श्री चक्रधर स्वामी यांच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेत आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिस्तबद्ध मिरवणूक हे विशेष आकर्षण ठरणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने प्रशासनानेही सुरक्षेची व वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी केली आहे.

भक्ती, परंपरा आणि अध्यात्माचा संगम असलेला हा सप्ताहभर चालणारा यात्रा महोत्सव परिसरात आध्यात्मिक उर्जेचे वातावरण निर्माण करत आहे. महाप्रसाद, सामूहिक प्रार्थना आणि संतवाङ्मयाच्या वाचनातून महानुभाव पंथाच्या शिकवणीचे पुनरुज्जीवन होत असल्याचे भाविकांनी व्यक्त केले.

सावळेद्वार ते जाळीचा देव ही दांडीयात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महानुभाव परंपरेच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दरवर्षी या यात्रेकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून असते.


No comments:

Post a Comment