सांगलीत उद्यापासून कृष्णाई मिनी सरस प्रदर्शन नंदिनी घाणेकर: विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांची मेजवानी
प्रतिनिधी :मुकुंद सुकटे
ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 'उमेद'च्यावतीने जिल्हास्तरीय 'कृष्णाई मिनी सरस' बचत गट उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर होत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर यांनी दिली.
घाणेकर म्हणाल्या, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे ५५ आणि २० खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती वस्तू, हस्तकला व खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे. ग्रामीणमहिलांना स्वतःच्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची आणि स्वावलंबनाची संधी या उपक्रमातून मिळत आहे. प्रदर्शनात विविध प्रकारचे केक, चकली, लाडू, शेव, मसाले, लोणची,विविध प्रकारच्या शेवया, पापड, सांडगे, चटण्या, तसेच सेंद्रिय धान्ये, गूळ, कडधान्ये, हळद, तिखट, पावडर मसाले, घरगुती साबण, अगरबत्ती, शो पीस, हस्तकला वस्तू, कापडी पिशव्या, भरतकाम साहित्य, साड्या, ड्रेस मटेरियल आदी उत्पादनांची विक्री होणार आहे. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना मार्केट उपलब्ध झाल्याने बचत गटांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून बाजारपेठ निर्माण करणे, हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे घाणेकर यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment