शिवरायांचा राज्यकारभार आजच्या प्रशासनासाठी आदर्श - तहसिलदार मा.विशाल नाईकवाडे
वार्ताहर :- गणेश ठाकरे लासलगाव
भाजीच्या देठालाही हात न लावण्याची प्रामाणिकता आणि स्त्री सन्मानासाठी अत्याचार करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा देणारी शिस्त, न्याय व स्त्री सन्मान यांवर उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारभार प्रशासनासाठी आदर्श व दिशादर्शक असल्याचे मत निफाडचे तहसीलदार मा.विशाल नाईकवाडे यांनी व्यक्त केले. शिरवाडे येथील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सरपंच तथा लासलगाव बाजार समितीचे संचालक डॉ. श्रीकांत आवारे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सव केवळ औपचारिक न राहता सामाजिक चळवळीत रूपांतरित झाला आहे. नियोजनबद्ध आयोजन, सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा सोहळा वर्षागणिक अधिक समृद्ध होत आहे.
सकाळी लासलगावचे स.पो.नि. दीपक पाटील यांचे हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून राष्ट्रभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. दुपारच्या सत्रात गावातील सर्व पुरुष व महिलांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले,ज्यामुळे महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर शिवमय झाला.
मिरवणुकीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य, नाटिका, गीत सादरीकरण, महिलांसाठी उखाणे अशा कार्यक्रमांनी उत्सवाला बहुरंगी स्वरूप प्राप्त झाले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला. परंपरा, प्रेरणा आणि सामाजिक एकतेचा संगम असलेला शिवजन्मोत्सव हा लोकसहभागातून उभा राहिलेला आदर्श उत्सव ठरला.

No comments:
Post a Comment