कळमनुरीत अवैध मटका जुगारावर पोलिसांचा धडक छापा; २२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कारवाई
दिनेश पत्की कळमनुरी
वृत्त हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत कळमनुरी शहरात अवैधपणे सुरू असलेल्या मटका जुगार आड्यावर छापा पोलिसांनी २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशानुसार विशेष पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास पथकाला गुप्त माहिती मिळाली की, प्रॉपर कळमनुरी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एक व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन राजेश्री नावाच्या मटका जुगाराच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या संगणकावरून प्रिंट काढून देत आहे. माहितीची खातरजमा करून पथकाने सायंकाळी सुमारे ५.२० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान पुरुषोत्तम उर्फ विलास कहाळे (वय ४८, व्यवसाय शेती, रा. ब्राह्मण गल्ली, कळमनुरी) हा इसम लोकांकडून पैसे स्वीकारून मटक्याच्या चिठ्ठ्या संगणकाद्वारे प्रिंट देताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून ६,३०० रुपये रोख रक्कम तसेच एक संगणक संच व प्रिंटर असा एकूण २२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संबंधित बिट पोलीस कर्मचारी करीत आहेत. सदर कारवाई विशेष पथकातील पोलीस कर्मचारी पवार व टाले यांनी पार पाडली. जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, गुटखा, गांजा, देशी-विदेशी दारू तसेच जुगार यांसारख्या अवैध व्यवसायांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

No comments:
Post a Comment