दुर्गम महाळभ्धा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता; ऋषिगड संस्थान विकासासाठी दहा गुंठे जमीन दान



सात दिवस हरिनामाचा अखंड गजर; पंचक्रोशीतील भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती


सोयगाव प्रतिनिधी.. दिलीप मोरे... 

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरातील ऋषिगड संस्थान, महाळभ्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पडली. दुर्गम भागात सात दिवस सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. पंचक्रोशीतील विविध गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घेतला.

१८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या या सप्ताहात दररोज नामस्मरण, प्रवचन व कीर्तनाचा अखंड कार्यक्रम पार पडला. पहिल्या दिवशी गोरक्षनाथ आखाडा, शिंदखेडा येथील योगी दत्तनाथजी महाराज यांनी कीर्तनातून आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून दिले. दुसऱ्या दिवशी आळंदी येथील गाथामूर्ती अरुण महाराज घोराडे यांनी संतपरंपरेचा सखोल ऊहापोह करत वारकरी चळवळीचे अधोरेखन केले.

तिसऱ्या दिवशी शेवगाव येथील सुदाम देवजी महाराज यांनी भक्तीबरोबर समाजजागृतीचा संदेश दिला. चौथ्या दिवशी पैठण येथील गीता मंदिराचे विष्णू महाराज जगताप यांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान साध्या भाषेत मांडले. पाचव्या दिवशी परभणी येथील वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज नाना झोलकर यांनी वैराग्य, नामसाधना आणि संयम यांचे महत्त्व स्पष्ट केले.

सहाव्या दिवशी आळंदी देवाची येथील माउली महाराज करंजकर यांनी वारकरी परंपरेचे माहात्म्य विशद केले. सातव्या दिवशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथील गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभावे यांनी प्रभावी कीर्तन सादर केले.

सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. यावेळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची येथील ज्येष्ठ अध्यापक परमपूज्य गुरुवर्य माणिकशास्त्री मुखेकर बाबा यांनी ओजस्वी कीर्तनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रीमद्भागवत गीता कथाकार संदीप महाराज सांगळे (ऋषिगड संस्थान, महाळभ्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भास्कर सोनवणे, बंडे मामा तसेच पंचक्रोशीतील अन्नदाते, सेवाभावी नागरिक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

सप्ताहादरम्यान अन्नछत्र, निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. सात दिवस हरिनामाच्या अखंड गजराने परिसरात भक्ती, श्रद्धा आणि समाजएकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

दरम्यान, ऋषिगड संस्थानाच्या भावी विकासासाठी बंडे मामा यांनी उदारपणे दहा गुंठे जमीन दान देण्याची घोषणा केली. या दानामुळे संस्थानाच्या विविध विकासकामांना गती मिळणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment