खाकीचं स्वप्न अधुरंच राहिलं! पोलीस भरतीवेळी धावताना तरूणाचा मृत्यू, मनाला चटका लावणारी घटना



प्रतिनिधी अक्षय डोंगरे 

 

बीड  — पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी घडलेली एक मन हेलावून टाकणारी घटना राज्यभरात हळहळ व्यक्त करत आहे. परळी येथील दीपक भास्कर वाव्हळ (वय २६) या तरुणाचा ११ फेब्रुवारी रोजी मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला.

जिल्हा पोलीस दलातील १७४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेला पहाटे ५ वाजता सुरुवात झाली होती. उमेदवार मोठ्या उत्साहात मैदानावर दाखल झाले होते. दुपारी सुमारे १२:३० वाजता १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपकला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला. उपस्थित पोलिसांनी तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर भरती प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. राज्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर दुपारपर्यंत शारीरिक चाचण्या घेण्याचा निर्णय कितपत योग्य होता, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातून आलेले अनेक उमेदवार अपुऱ्या आहारावर आणि तीव्र उकाड्यात चाचणी देतात, याकडे दुर्लक्ष झाले का?

दीपक वाव्हळ हा पोलीस बनण्याच्या स्वप्नाने प्रेरित तरुण होता. अनेक वर्षांच्या तयारीनंतर तो मैदानावर उतरला होता. मात्र ११ फेब्रुवारीचा दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला आणि त्याचे खाकीचे स्वप्न अधुरेच राहिले.

या घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. परंतु केवळ शोक नोंदवून चालणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शारीरिक चाचण्यांचे वेळापत्रक, वैद्यकीय सुविधा आणि उमेदवारांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.प्रश्न अजूनही तसाच आहे खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोणाची?


No comments:

Post a Comment