महागावात जिओ नेटवर्कचा बोजवारा दोन दिवसांपासून रेंज गायब, ग्राहकचा संतप्त



प्रतिनिधी अक्षय डोंगरे 

महागाव शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जिओ नेटवर्क पूर्णपणे कोलमडले असून हजारो ग्राहक अक्षरश संपर्कविहीन झाले आहेत. मोबाईलला रेंज नाही, कॉल लागत नाहीत, इंटरनेट बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेटवर्क नाही हा संदेश पाहून ग्राहक वैतागले आहेत.

ऑनलाईन व्यवहार, UPI पेमेंट, बँकिंग सेवा, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग, शेतकऱ्यांचे व्यवहार सर्व काही ठप्प झाले आहे. डिजिटल भारताच्या गप्पा मारणाऱ्या कंपनीची सेवा मात्र महागावात कोमात गेल्याची टीका नागरिक करत आहेत.

विशेष म्हणजे, कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधला असता ठोस उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. रिचार्ज वेळेवर घेतले जाते, पण सेवा मात्र बेपत्ता असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे.

दोन दिवस नेटवर्क बंद असणे ही साधी तांत्रिक अडचण नाही, तर सेवा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचा आरोप होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

महागावातील जिओ ग्राहक आता एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा देत आहेत. तात्काळ नेटवर्क पूर्ववत करावे, बिघाडाचे कारण जाहीर करावे आणि ग्राहकांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी होत आहे.

प्रश्न स्पष्ट आहे 

महागावात जिओ नेटवर्क कोलमडण्यामागे नेमके कारण काय? आणि ग्राहकांना असा त्रास किती दिवस सहन करावा लागणार?


No comments:

Post a Comment