अहिल्यानगर हादरले! नेवासा तालुक्यातील घोडेगावात गँगवॉरचा भडका; गोळीबारात एकाचा मृत्यू, तणावाचे वातावरण.
दर्पण न्यूज (नेवासा) प्रतिनिधी : नवनाथ घावटे
अहिल्यानगर : जिल्ह्यातील नेवासा तालुका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दोन गटांमधील जुन्या वैमनस्यातून आज दिवसाढवळ्या थरारक गोळीबाराची घटना घडली आहे. या गँगवॉरमध्ये एका ३३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नितीन शिरसाठ (वय ३३) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर सुरज फुलमाळी हा या घटनेत गंभीररीत्या जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव परिसरात आज अचानक दोन गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. या वादाचे रूपांतर हाणामारीत आणि नंतर गोळीबारात झाले. हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून (पिस्तूल) थेट गोळ्या झाडल्या. यातील गोळ्या लागल्याने नितीन शिरसाठ याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच सुरज फुलमाळी हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर तातडीने मयत आणि जखमी तरुणाला उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, धक्कादायक प्रकार म्हणजे, जखमींना रुग्णालयात आणल्यानंतर तिथेही दोन्ही गटांचे समर्थक पुन्हा आमनेसामने आले. रुग्णालय परिसरातच दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला, ज्यामुळे रुग्णालयात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही गटांतील काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना जुन्या भांडणातून आणि पूर्ववैमनस्यातून घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नेवासा तालुक्यात गेल्या दोनच दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा धाक उरला नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गावठी कट्टे आणि घातक शस्त्रे गावात येतात कोठून, असा प्रश्न लोक विचारत आहेत. बेकायदेशीर शस्त्रांचा असा खुलेआम वापर होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर तातडीने कठोर कारवाई करावी आणि अशा घटना रोखाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

No comments:
Post a Comment