रामवाडीच्या नागरिकाने दाखवली प्रामाणिकतेची ओळख हरवलेली मौल्यवान पर्स सुरक्षित केली परत
दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी शहरात प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवणारी घटना घडली आहे. कळमनुरी आठवडी बाजार परिसरात एका महिलेची हरवलेली पर्स प्रामाणिक नागरिकामुळे सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात जमा करून मूळ मालकाला परत मिळाली आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास कळमनुरी येथील जयश्री दीपक गायकवाड या कामानिमित्त बाहेर जात असताना जुन्या बसस्थानक परिसरात त्यांची पर्स हरवली. पर्समध्ये रोख रक्कम, एटीएम कार्ड तसेच दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू होत्या.
ही पर्स रामवाडी येथील कृष्णा रामजी मोरे यांना आढळून आली. त्यांनी कोणताही गैरवापर न करता तत्काळ कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये पर्स जमा केला. नागरिक कांता पाटील यांच्या मदतीने पोलीसांनी पडताळणी करून सदर पर्स जयश्री गायकवाड यांना सुपूर्द केली. या प्रामाणिकपणाची दखल घेत पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी कृष्णा रामजी मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व समाजात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी पोलीस उपाधीक्षक कुंदनकूमार वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे आदी उपस्थित होते. हरवलेली पर्स मिळाल्याने जयश्री गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रामाणिक नागरिकांमुळे समाजात विश्वास टिकून असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment