कळमनुरी बसस्थानकाच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करा परिवहन मंत्र्यांना निवेदनः चौकशी होईपर्यंत काम थांबविण्याची मागणी
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
शहरातील बसस्थानक इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकामात तांत्रिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांना तहसीलदार कळमनुरी यांच्या मार्फत गुरूवारी (दि.१२) निवेदन देण्यात आले.
कळमनुरी येथील बसस्थानक इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने संबंधित इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकाम प्रक्रियेत तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बांधकामाचे काम
थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. सतीश पाचपुते, अॅड. इलियास नाईक, मोहम्मद परवेज, नितीन जिंतुरकर, शेख महेबुब, बबन डुकरे, गौतम खंदारे, सिद्धार्थ बलखंडे, श्रीराम असोले, संदीप पाचपुते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:
Post a Comment