रोडरोमिओंमुळे मुलींना परीक्षेला जाणे अवघड आखाडा बाळापूरमधील केंद्रांवर उच्छाद
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनूरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, येथील परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्यासाठी येत आहेत. मात्र, यावेळी मुलींची छेड काढण्याच्या हेतूने अनेक रोड रोमिओ कर्कश्श हॉर्न वाजवत 'धूम स्टाइल' वाहन चालवून उच्छाद मांडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालक चिंतीत असून पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आखाडा बाळापूर येथे नारायणराव वाघमारे महाविद्यालय व राजर्षी शाहू महाविद्यालय ही दोन परीक्षा केंद्रे आहेत.
नारायणराव वाघमारे महाविद्यालयात एकूण ४६३ परीक्षार्थी परीक्षा देत असून, त्यामध्ये जवळपास अडीचशे मुली आहेत. राजर्षी शाहू विद्यालयामध्ये एकूण ४५५ परीक्षार्थी परीक्षा देत असून, त्यामध्ये जवळपास ३२० मुली आहेत. मुलांच्या तुलनेत मुली जास्त असल्याने दोन्ही परीक्षा केंद्रांवर पेपर सुटल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रोड रोमिओंनी उच्छाद मांडला आहे. भरधाव दुचाकीवर येत, कर्कश्श हॉर्न वाजवीत मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न रोड रोमिओ करत आहेत. महाविद्यालयाच्या दोन्ही प्राचार्यांनी याबाबत आखडा बाळापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली आहे. तरीही पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब पोलिसांनी गांभीयनि घेऊन परीक्षा केंद्राच्या जवळपास पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत व मुलींची होणारी छेड थांबवावी, अशी मागणी पालक करत आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रावर परीक्षार्थी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. बाळापूर शहर व ग्रामीण भागातील मुली जास्त असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही पोलिसांना कळविले आहे. पोलिसांनी परीक्षेच्या काळात मुलींची छेड होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे
आखाडा बाळापूर येथील परीक्षा केंद्र परिसरातील तक्रारी आल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही तिथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. इतरही केंद्रांवर परीक्षेदरम्यान महिला पोलिस कर्मचारी वाढवण्यात येणार आहेत. - डॉ. नीलाभ रोहन,
दामिनी पथक आहे कुठे ?
आखाडा बाळापूर येथील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील मुली मोठ्या संख्येने येतात. शहरातील मुलीच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दामिनी पथकाची स्थापना केली होती; परंतु बाळापूर शहरातील दामिनी पथक कुठे आहे? असा प्रश्न पालक करत आहे. पूर्वी शहरात दामिनी पथकाची नियमित गस्त होत असल्याने रोड रोमिओंमध्ये दहशत होती. मात्र, आता दामिनी पथकच गायब असल्याने रोड रोमिओ पुन्हा उच्छाद मांडत आहेत.
केवळ दोन कर्मचारी
यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून शाळांभोवती चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, आखाडा बाळापूर परिसरातील केंद्रांवर केवळ एक किंवा दोन कर्मचारी दिसत असल्याचे पालकांनी सांगितले आहे. परीक्षा संपताच कर्मचारी निघून जातात. त्यामुळे परीक्षा सुटल्यावर मुलींना या रो रोमिओंचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे पालकांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment