जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाची जागा घाणीच्या विळख्यात! नगरपंचायत गप्प का?



प्रतिनिधी अक्षय डोंगरे 

महागाव (विरुगुळा केंद्र) येथील जेष्ठ नागरिक मंडळाची आजची अवस्था ही केवळ दुर्लक्षाची नसून, ती प्रशासनाच्या असंवेदनशीलतेची आणि सामाजिक बांधिलकीच्या ऱ्हासाची ठळक साक्ष देणारी आहे. ज्या जागेवर कधीकाळी महागावची ग्रामपंचायत कार्यरत होती, जिथे गावातील नागरिक, विशेषत जेष्ठ मंडळी, रोज एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करत होती, तीच जागा आज घाणीच्या साम्राज्यात गाडली जात आहे.

स्वच्छता, देखभाल आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचे गोडवे गाणारे फलक सर्वत्र झळकतात मात्र प्रत्यक्षात या जागेकडे पाहिले असता महागाव नगरपंचायतीचा दुटप्पीपणा उघडपणे दिसतो. चारही बाजूंनी साचलेला कचरा, प्लास्टिकचा सडा, वाढलेली झुडपे आणि असह्य दुर्गंधी यामुळे ही जागा आज आजारांचे केंद्र बनली आहे. जेष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली जागा अशी बेवारस अवस्थेत पडून असणे ही साधी प्रशासकीय चूक नसून, ती एक गंभीर सामाजिक अपयशाची कबुली आहे.

जेष्ठ नागरिक म्हणजे अनुभव, शहाणपण आणि संस्कारांची चालती-बोलती शिदोरी. मात्र त्यांच्यासाठी असलेली जागाच जर अस्वच्छ, असुरक्षित आणि दुर्लक्षित असेल, तर समाज म्हणून आपण नेमके कुठे चाललो आहोत, हा प्रश्न उपस्थित होतो. नगरपंचायतीच्या उदासीनतेमुळे आज अनेक जेष्ठ मंडळी या ठिकाणी येणे टाळत आहेत. परिणामी, समाजसंवादाची आणि सामाजिक एकोप्याची एक महत्त्वाची जागा हळूहळू नामशेष होत आहे.


येथे प्रश्न थेट आणि स्पष्ट आहे

महागाव नगरपंचायत या जागेची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी कोणती कारवाई करत नाही? जेष्ठ नागरिक मंडळाची जबाबदारी नेमकी कोणाची? की जेष्ठ नागरिक हे फक्त निवडणुकीपुरते आठवायचे घटक आहेत?

विशेष म्हणजे, या जागेवर वाचनालय सुरू करावे, जेणेकरून जेष्ठ नागरिकांसह तरुण पिढीलाही वाचन, अभ्यास आणि संवादासाठी एक सुसंस्कृत केंद्र मिळेल, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र ही मागणीही प्रशासनाच्या फाईलींमध्येच धूळ खात पडून आहे का, असा सवाल उपस्थित होतो.

स्वच्छ भारत अभियानाचे ढोल बडवले जात असताना, जेष्ठ नागरिकांच्या जागेवर साचलेली घाण हे त्या घोषणांचे विदारक वास्तव दाखवते. आता केवळ पाहणी, आश्वासने आणि फोटोसेशन नको तर तातडीची स्वच्छता, नियमित देखभाल आणि वाचनालयासारखी सकारात्मक सुविधा उभी राहणे गरजेचे आहे.

अन्यथा, ही घाण फक्त विरुगुळा केंद्रापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती महागाव नगरपंचायतीच्या विश्वासार्हतेवर कायमचा डाग उमटवेल.

प्रश्न शेवटी एकच जेष्ठ नागरिकांचा सन्मान भाषणांत राहणार, की प्रत्यक्ष कृतीत दिसणार?


No comments:

Post a Comment