महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांनी जोपासले सेवानंद व्रत
प्रतिनिधी - सुरेंद्र जाधव
महाबळेश्वर/वाळणे - महाशिवरात्री हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी विविध प्रकारची सेवा केली जाते. श्री शिवाचे स्मरण करतात. प्रार्थना, उपवास, नैतिकता व सद्गुणांचे मनन करून सण साजरा केला जातो . भाविक एखाद्या शिवमंदिराला भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतात.
हर हर उत्तेश्वर सेवा भावी संस्था (रजि.) या संस्थेने महाशिवरात्रीच्या निमित्ताने स्वयंभू श्री उतेश्वर मंदिराला भेट दिली व भगवान श्री शंकराचे सर्वांनी दर्शन घेतले. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत,कोयना नदीच्या काठावर वसलेल्या वाळणे गावच्या डोंगरमाथ्यावर स्वयंभू महादेवाचे पुरातन जागृत देवस्थान आहे. मु. वाळणे, पो. आहिर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे स्वयंभू श्री उतेश्वराचे सुंदर मंदिर स्थित आहे. साऱ्या महाराष्ट्रात या जागृत देवस्थानची किर्ती आहे. उतेकर व सकपाळ बंधूंचे हे कुलदैवत.
महाशिवरात्री निमित्त श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे, पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त या स्वयंभू जागृत देवस्थानला भेट देतात.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून येथे दर्शनासाठी आलेल्या शिवभक्त, भाविकांसाठी हर हर उत्तेश्वर सेवा भावी संस्था ( रजि.) च्या वतीने उपवास फराळी चिवडा, केळी व खजूर अशा उपवास फराळाचे वाटप करण्यात आले. शिवभक्ती व भक्तसेवा असा दुहेरी सात्विक आनंदाचा संगम या उपक्रमाद्वारे साधला गेला .या शिवकार्याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिवभक्त आदि सदस्य उपस्थित होते. 'आनंदातून सेवा, सेवेतून आनंद!' देणारा हा सुंदर उपक्रम.
अतिशय दुर्गम भागात महाशिवरात्रीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या संस्थेच्या सुंदर उपक्रमाने शिवतत्त्व अभंग असल्याचे सिद्ध केले. दरवर्षीमहाशिव रात्री निमित्त येणाऱ्या लहान - थोर, ज्येष्ठ, वृद्ध अशा सर्व भाविकांसाठी ही संस्था दरवर्षी विविध उपक्रम राबवत मोलाचं सहकार्य करीत आहे.
श्री उतेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, शिवभक्त, स्वयंसेवक, भाविकांनी हर हर उतेश्वर सेवा भावी संस्था (रजि.) चे मनस्वी आभार मानले. संस्थेच्या भावी यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. या शिवकार्यास ज्या दानशूर व्यक्तींनी, शिवभक्तांनी संस्थेस अनमोल सहकार्य केले त्यांचे हर हर उतेश्वर सेवा भावी संस्था रजि. च्या वतीने मनस्वी आभार मानतो. आम्ही आपल्या सर्वांचे कायम ऋणी आहोत.

No comments:
Post a Comment