श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची उत्साहात सांगता १५ दिवसांत सुमारे १० लाख भाविकांनी घेतले दर्शन – देवस्थान ट्रस्टची माहिती.
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. यात्रोत्सव काळात पंधरा दिवसांत सुमारे १० लाख भाविकांनी घेतले दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली.
यात्रोत्सव दि ३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरू झाला. नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेनिमित्त श्री मतोबा महाराज यांचा यात्रोत्सव भरविण्यात आला. हा उत्सव अखंड पंधरा दिवस सुरू होता.
यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, सुनील जैन, भारती जैन तसेच दर्शन रांगेत उभे असलेले भाग्यवान भाविक प्रविण पाटील व अनिता पाटील यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांच्या नव्या चांदीच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे महंत महामंडलेश्वर १०८ जनेश्वरानंदगिरीजी महाराज व रथाचे मानकरी मोहन खापरे यांच्या हस्ते रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावर्षी रथ मिरवणुकीस प्रारंभ करताना रथाला पहिली बैलजोडी जुंपण्याचा मान सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील शेतकरी नंदकिशोर महात्मे यांना देण्यात आला होता.
भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शन रांगा व मंडपाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात प्रसाद विक्रीसाठी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची तसेच नारळ फोडण्यासाठी यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा कालावधीत दररोज सकाळी ६, दुपारी १२ व संध्याकाळी ७ वाजता संगीतबद्ध आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक नामवंत बँड पथकांनी यात्रोत्सवात सहभागी होत आपली वाद्यकला सादर केली. यात्रोत्सवात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांची महाआरती करून यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.
यात्रोत्सव काळात निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण आरोग्य चमू सतर्क राहून भाविकांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत होती. त्यामुळे यात्राकालावधीत कोणतीही रोगराई पसरली नाही. ग्रामपंचायत सरपंच निशा पाठक, उपसरपंच मोतीराम भवर, ग्रामविकास अधिकारी उज्वला भोईर व सदस्य मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक, भाविक व ग्रामस्थांना रस्ते, पाणी व स्वच्छतेच्या सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आल्या. यात्रोत्सवात सहभागी झालेल्या सर्व घटकांनी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत व्यवस्थापनास सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.- गायत्री बोरगुडे अध्यक्षा, यात्रा समिती ग्रामपंचायत, नैताळे

No comments:
Post a Comment