वाळुंज जिल्हा परिषद–पंचायत समिती गट-गणात ‘बंडखोरी’चा इशारा!



पक्षश्रेष्ठींनी डावलले निष्ठावंत… आता निवडणुकीत ‘धक्का’ देणार का?!!

वाळूज महानगर प्रतिनिधी : पांडुरंग गायकवाड

वाळुंज जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत यंदा राजकीय वातावरण प्रचंड तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अनेक पक्षांतील नाराज निष्ठावंत कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न घेता उमेदवारी वाटपाचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

गेल्या काही दशकांपासून पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे, कार्यक्रमांना पुढे असणारे, जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणारे खरे निष्ठावंत कार्यकर्तेच बाजूला सारले जात असल्याची चर्चा वाळूज परिसरात जोर पकडत आहे.

“आम्ही काम करायचं… फायदा मात्र दुसऱ्याचाच?”

वाळूज गटात सध्या एकच चर्चा ऐकायला मिळत आहे—

कार्यकर्त्यांच्या घामावर मोठे नेते उभे राहतात, पण उमेदवारीच्या वेळी मात्र निष्ठावंतांना डावलले जाते!

या नाराजीचा फटका आता थेट निवडणुकीत बसू शकतो. काही नाराज कार्यकर्त्यांनी तर थेट बंडखोरीचा सूर लावल्याची चर्चा असून, “आता आम्ही गप्प बसणार नाही” असा रोष उघडपणे व्यक्त केला जात आहे.

पक्षासाठी झटले… आता ‘पक्षानेच’ त्यांना संपवलं?

वाळुंज गट आणि गणात अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी पक्षासाठी सर्वस्व खर्ची घातले, गावोगाव प्रचार केला, मतदार जोडले, लोकांच्या अडचणी सोडवल्या.

परंतु उमेदवारीच्या वेळी पक्षश्रेष्ठींनी परप्रांतीय चेहऱ्यांना, बाहेरच्या प्रभावशाली लोकांना किंवा पैशाच्या जोरावर पुढे आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे.

यामुळेच आता या परिसरात “उमेदवाराला दमशक” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मतदारांमध्ये संभ्रम… “यावेळी कोणाच्या मागे जायचं?”

सध्याची परिस्थिती पाहता वाळूज गट व गणात मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला दिसतोय.

गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे की,

पक्षाचा उमेदवार निवडायचा की गावातील कार्यकर्ता?

काम करणाऱ्याला साथ द्यायची की नेत्यांच्या आदेशाला?

पक्षश्रेष्ठींची कसोटी… नाराजी आटोपणार की फुटणार ‘बंड’ ?

आता सर्वांचे लक्ष एका मुद्द्याकडे लागले आहे—

पक्षश्रेष्ठी नाराज कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात किती सक्षम ठरतात?

वेळीच डॅमेज कंट्रोल झाला नाही तर वाळूज गटात आणि गणात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन निवडणुकीचा खेळ उलटू शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 


No comments:

Post a Comment