ओमसाई इन्स्टिट्यूटमधील इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा व निरोप समारंभ : विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा
संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)
महाड : येथील नामांकित ओमसाई इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ नुकताच उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा देणारा व आत्मविश्वास वाढवणारा हा समारंभ संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. महेश बागडे यांनी ओमसाई इन्स्टिट्यूटच्या गेल्या १६ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. दहावी व बारावी बोर्ड परीक्षांसह JEE, NEET, CET यांसारख्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी येथे दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. दीपक क्षीरसागर, प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी, डॉ. शलाका बागडे, प्रा. अमोल गंगावणे, प्रा. दत्तात्रय बामणे, प्रा. आशुतोष शिंदे, प्रा. विनय खैरे, प्रा. बिपीन पुरके, प्रा. प्रीती जाधव, प्रा. एकता नाडकर, प्रा. निशा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. दीपक क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांकडे उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर वेळ असून निराशा, आळस व नकारात्मकता बाजूला ठेवून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशाचे शिखर गाठता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्य मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. संभाजीराव सूर्यवंशी म्हणाले की, आई-वडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी तसेच स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करणे अत्यावश्यक आहे. आजचे युग अत्यंत स्पर्धात्मक असून गुणवत्तेला सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक क्षण मोलाचा असून गुणवत्ता व पात्रतेशिवाय उज्ज्वल करिअर शक्य नाही, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अमोल गंगावणे यांनी केले.

No comments:
Post a Comment