शिंदे केशर आंबा बागेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट रा. जि. प. शाळा कोंडीवते नं. २ चा उपक्रम

 


संभाजीराव सूर्यवंशी (महाड प्रतिनिधी)

महाड: रा. जि. प. शाळा, कोंडीवते नं. २ (ता. महाड, जि. रायगड) येथील विद्यार्थ्यांची शिंदे केशर आंबा बाग, कोथेरी येथे रविवारी (दि. ४ जानेवारी २०२६) शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शेतीविषयक ज्ञान मिळावे, फळबाग व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने ही क्षेत्रभेट राबविण्यात आली. सुमारे ४० एकर क्षेत्रात विकसित असलेल्या शिंदे केशर आंबा बागेत २४ विविध प्लॉट असून त्यामध्ये आंब्याच्या ९०, फणसाच्या २४ विविध जातींसह काजू, नारळ, जांभूळ तसेच इतर फळझाडांची लागवड करण्यात आलेली आहे. फळझाडांच्या मधल्या जागेत चाफा, शेवगा आदी उपयुक्त झाडांची लागवड करून शास्त्रीय पद्धतीने संतुलित विकास साधण्यात आला आहे.आंब्याची लागवड इस्रायल पद्धतीने करण्यात आली असून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन व गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येत असल्याची माहिती बागेचे व्यवस्थापक मा. श्री. संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ घेतला. भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून सहभागी करून योग्य उत्तरे देणाऱ्यांना नवीन वर्षाचे कॅलेंडर व भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मा. श्री. दिलीप शिंदे यांनी गेल्या ३० वर्षांतील बागेचा विकासप्रवास, आलेल्या अडचणी, अनुभव व भविष्यातील दीर्घकालीन दृष्टीकोन याविषयी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. याच वेळी विद्यार्थिनी कु. तन्वी शेलार हिचा वाढदिवस साजरा करून आनंदाचा क्षण अनुभवण्यात आला.क्षेत्रभेटीनंतर शिंदे बंधू यांच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची (बिर्याणी) व्यवस्था करण्यात आली. या आपुलकीच्या आदरातिथ्यामुळे वातावरण प्रसन्न झाले.

या उपयुक्त व प्रेरणादायी शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी मा. श्री. दिलीप शिंदे व मा. श्री. संजय शिंदे यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा प्रगतिशील आणि निसर्गस्नेही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समृद्ध होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सदर क्षेत्रभेटीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापक श्री प्रदीप शिंदे, सहाय्यक शिक्षक किशन मुगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सीमा वाडकर, उपाध्यक्ष / माजी सरपंच श्री सतीश जागडे, पोलीस पाटील श्री धोंडीराम डिगे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment