जेवण देतात, वाहनानं आणतात-नेतात. झेंडा हातात घेऊन गल्लीबोळात पाम्फलेट वाटायचं, थोडं ओरडायचं...बस्स. अजून काय पाहिजे?



' ( दैनिक दर्पन प्रति. पांडुरंग गायकवाड)

ग्रामीण भागातून आलेल्या एका महिलेने या सहज बोलण्यातून सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रचारामागचं वास्तव मांडले. यातून अनेकांना रोजगारही मिळाल्याचे दिसून आले.महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगात आहे. शहरातील गल्लीबोळ, चौक, बाजारपेठ, वस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रचार करणाऱ्या महिला दिसून येत आहेत. यातील बहुतांश महिला या ग्रामीण भागातून खास प्रचारासाठी येत आहेत. त्यांना आणण्याची जबाबदारी मुकादमांना दिली जात आहे.

मुकादम म्हणजे ग्रामीण भागातून मजूर, कामगार आणणारा मध्यस्थ. आता हाच मुकादम निवडणूक प्रचारासाठी महिलांना शहरात आणण्याचे काम करत आहे. एका महिलेला साधारण चारशे रुपये रोज दिले जात असून, दोनशे रुपये मुकादमाला मिळतात. वाहनभाडे वेगळे दिले जाते. सकाळी ठरावीक ठिकाणाहून महिलांना वाहनात बसवून शहरात आणले जाते.

संबंधित पक्षाचा किंवा उमेदवाराचा झेंडा हातात देऊन प्रचार साहित्य वाटप, घोषणा देणे, फेरीत चालणे, गल्लीबोळात फिरणे अशी कामे त्यांना दिली जातात. दुपारी जेवणाची सोयही केली जाते. दुपारी चारच्या सुमारास पुन्हा त्याच वाहनातून महिलांना गावाकडे सोडले जाते.

जास्त माणसं म्हणजे जास्त ताकद...

उमेदवाराच्या मागे किती लोकं आहेत, किती गर्दी जमते, हे दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो. जास्त माणसे म्हणजे जास्त ताकद, असा समज राजकीय वर्तुळात रुजलेला आहे. त्यामुळे काही पक्ष तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावर हा मार्ग महापालिका निवडणुकीत अवलंबत असल्याचे दिसत आहे.

जनाधार की दिखावा?

दुसरीकडे ग्रामीण महिलाही या कामाकडे मजुरी म्हणूनच पाहत आहेत. शेतमजुरीपेक्षा कमी कष्टाचे आणि तेवढ्याच पैशाचे काम म्हणून त्या प्रचाराला येत आहेत. मात्र, लोकशाही प्रक्रियेत अशा 'भाडोत्री गर्दी'मुळे प्रचाराचे स्वरूप बदलत असून, खरा जनाधार आणि दिखावा यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


No comments:

Post a Comment