निवडणूक आली की खडी, निवडणूक गेली की शांतता!
सावळदबारा परिसरात ‘विकास’ केवळ प्रचारापुरताच?
प्रतिनिधी सोयगाव...
दिलीप मोरे...
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात दरवेळी निवडणूक जवळ आली की विकासाचे फलक झळकतात, आणि निवडणूक संपली की विकासाची कामे ‘जैसे थे’ पडून राहतात—हा जुना अनुभव पुन्हा एकदा समोर आला आहे. देवळगाव गुजरी ते सावळदबारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असतानाही प्रशासनाने डोळेझाक केली. अखेर नांदा तांडा–घाणेगाव तांडा रस्त्याच्या कामाचा मुहूर्त थेट यात्रेच्या तोंडावर काढण्यात आला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दि. ३० जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या भगवान श्रीचक्रधर स्वामी महाराजांच्या यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक सावळदबारा व श्रीक्षेत्र येथे दाखल होणार आहेत. मात्र या पवित्र यात्रेच्या काळातच रस्त्याचे खोदकाम, मोकळी खडी आणि अर्धवट काम सुरू झाल्याने भाविक, वाहनचालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
या रस्त्यावर एस.टी. बस, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु योग्य दबाई न करता फक्त खडी टाकून ठेवण्यात आल्याने वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून अपघाताचा धोका गंभीरपणे वाढला आहे. तरीही संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नेते विकासाच्या घोषणा देण्यात व्यस्त, तर प्रत्यक्षात प्रशासन मात्र भाविकांच्या सुरक्षिततेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. यात्रेसारख्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमाच्या काळात दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना, निकृष्ट काम आणि संथ गतीमुळे प्रशासनाची निष्काळजी भूमिका उघडी पडली आहे.
या रस्त्याच्या खोदकामाचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसत असून गावकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“दरवेळी निवडणूक आली की रस्त्यांची आठवण येते, आणि निवडणूक संपली की खडी तशीच पडून राहते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. त्यामुळे हे काम म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप परिसरात खुलेआम केला जात आहे.
भाविकांची गैरसोय, स्थानिक नागरिकांचे हाल आणि यात्रेची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता लक्षात घेता, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment