छत्रपती शिवाजी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन



सोयगाव प्रतिनिधी. दिलीप मोरे

सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्था सचिव श्रीमती रत्नाबाई कोलते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण कोलते यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व महान सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या व दलितांच्या शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली, असे त्यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, सती प्रथा व जातिवाद याविरोधात ठामपणे आवाज उठवला. विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देत पीडित महिलांसाठी आश्रयगृहे स्थापन केली. ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षण व सामाजिक सुधारणा कार्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.

कार्यक्रमास संस्थाध्यक्ष श्री. भाऊराव कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा गणवेश परिधान केला होता, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिक वाढले.

या कार्यक्रमाची माहिती जीवन कोलते यांनी दिली.



No comments:

Post a Comment