विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव; पिंपळवाडी जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा



सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे..

जि. प. शाळा पिंपळवाडी येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्र सावळदबारा (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रवीणकुमार गावंडे व सहशिक्षक श्री. दीपक सैतवाल यांनी केले असून केंद्रप्रमुख श्री. जनार्दन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. वंदना सतीश सावंत व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बुद्धेश्वर खरे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले भजी, चिप्स, पाणीपुरी, भेळ, पोहे, इडली-सांबार, पावभाजी, वडापाव, समोसा, गुलाबजामुन, राजगिरा लाडू आदी विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहारज्ञान व उपक्रमशीलता वाढीस लागली.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. संदीप महादू खरे, सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, महिला मंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला पालक व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment