शिक्षकांना आता केंद्राच्या 'अॅप'चा ताप संघटना संतप्त : झालेले काम पुन्हा करण्याची वेळ



खुलताबाद प्रतिनिधी 

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील शाळांचे 'जिओ टॅगिंग' करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारच्या अॅपसाठी पुन्हा 'जिओ टॅगिंग' करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना आता केंद्र सरकारच्या अॅपचा ताप सहन करावा लागणार आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त यांना शाळांच्या जिओ टॅगिंगबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळेच्या ठिकाणाची (अक्षांश-रेखांश) अचूक माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्यासाठी नवा अॅप विकसित करून उपलब्ध करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ते तयार केले आहे.

या अॅपद्वारे संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन, शैक्षणिक साधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तसेच आलेखात्मक विश्लेषण करण्यासाठी होणार आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलमध्ये यूडायस प्लस जीआयएस कॅप्चर मोबाईल अॅप घेऊन यूडायसच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे मोबाईल अॅपमध्ये जाऊन शाळेच्या ठिकाणाची माहिती अचूक नोंदवावी. जिल्ह्यातील सर्व शाळांना 'यूडायस प्लस जीआयएस कॅप्चर मोबाईल अॅप' द्वारे शाळेच्या ठिकाणाची माहिती मार्गदर्शक सूचनांनुसार तत्काळ नोंदविण्यासाठी कळवण्यात यावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी राज्यातील शाळा आणि अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेऊन शाळांना जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी जिओ टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, आता केंद्र सरकारच्या अॅपसाठी मुख्याध्यापक, शिक्षकांना तेच काम पुन्हा करावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

" शिक्षण विभागाचे अनेक अॅप आधीच मोबाईलमध्ये असल्याने मोबाईल बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तीच ती कामे किती वेळा करायची,किती वेळा शिक्षकांनी स्वतःचा मोबाईल शासनाच्या कामासाठी वापरायचा ? सततचे ऑनलाइन दुवे, अॅपमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. याचा कोणी विचार करणार आहे की नाही?*विजय कोंबे,राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.*

No comments:

Post a Comment