कडाक्याच्या थंडीने कुही थरथरली; गावागावात शेकोट्यांची रेलचेल..
स्वप्निल खानोरकर
कुही : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून विशेषतः रात्रीच्या वेळी तापमानात झपाट्याने घट होत आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत गारठ्याची तीव्रता स्पष्ट जाणवत आहे. रस्त्यांवर सुकून पडलेला धुरकट थर, झाडांच्या पानांवर जमा झालेले दवबिंदू आणि ऊब मिळवण्यासाठी शेकोटीचा शोध घेत बाहेर पडणारे युवक यामुळे हिवाळ्याची ठसठशीत चाहूल जाणवू लागली आहे.
रात्रीच्या वेळी तालुक्यातील दृश्य अगदी वेगळेच दिसून येत आहे. गावागावच्या रस्त्यांवर काही युवक मोठी शेकोटी पेटवून तिच्या भोवती गोळा होत ऊब घेताना दिसतात. शेकोटीच्या प्रकाशात एकमेकांशी होत असलेल्या गप्पा, हास्य आणि आनंदाचे क्षण अधिक खुलून दिसत आहेत. काहीजण हात शेकोटीकडे धरून उब घेत आहेत, तर काही पाय गरम करत गारठा दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शांत रात्रीत लाकडं जळण्याचा ‘चट्-चट्’ आवाज आणि पसरलेली थंडी यामुळे हिवाळ्याचा अनुभव अधिक मनोहारी भासत आहे.
थंडी एवढी वाढली आहे की रात्री बाहेर उभं राहणंही कठीण होत आहे. मात्र शेकोटीभोवती बसल्यावर वेगळीच मजा आणि ऊबदार मैत्रीची भावना निर्माण होते. मंद उजेडातील गल्ली, थंड वारा आणि शांत वातावरणामुळे हे दृश्य अधिकच जिवंत भासत आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, तापमानात २ ते ३ अंशांची घट नोंदली गेली असून पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेस दाट धुक्याची चादर पसरत असून शेतकरी, प्रवासी व दुचाकीस्वार यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जाड कपडे, स्वेटर, मफलर आणि कानटोपींचा वापर वाढला आहे.
सकाळ-संध्याकाळ धुक्याचा मारा सुरू असून तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हिवाळ्याची थंडी जोर धरत असताना शेकोट्यांमुळे गावात ऊबदार मैत्रीचा माहोल कायम राहतोय.पचखेडीत वाढत्या थंडीला हरवताना शेकोटीभोवती ऊबदार मैफिल रंगवणारे युवक.
.jpg)
No comments:
Post a Comment