आतंक माजवणारा बिबट्या देवगाव परिसरात अखेर जेरबंद
प्रतिनिधी: गणेश ठाकरे लासलगाव
देवगाव व देवगाव फाटा परिसरात आतंक माजवणारा बिबट्या आज पहाटे पिंजऱ्यात कैद झाला. या परिसरात गत आठवड्यात पिंजऱ्यात सापडलेला हा दुसरा बिबट्या आहे.
गत आठवड्यात देवगाव येथे धुमाकूळ घालणार नरभक्षक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला होता. दरम्यान, या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये. त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतु, वनविभागाचे सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे व स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी आंदोलकांची समजूत काढत बिबट्याला म्हसरूळ येथील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्रात हलविले. यावेळी आंदोलकांना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी पिंजऱ्यात कैद झालेल्या नरभक्षक बिबट्या ठार मारण्याची शासनास पाठविलेले परवानगीचे पत्र तसेच देवगाव, रुई परिसरात वनविभागामार्फत ड्रोन कॅमे-याद्वारे बिबट्यांचे सर्व्हेक्षण करुन तात्काळ बिबटे बंदिस्त करण्याची कारवाई वनविभागामार्फत करण्यात येईल व यापुढे रुई, देवगांव परिसरात मनुष्यहानी झाल्यास त्यास वनविभाग जबाबदार राहिल. तरी वनविभागाचे नियमानुसार कार्यवाही करणेकामी सदर बिबट्या पिंज-यासह जागेवरुन हलवुन देणेस विनंती पत्र आंदोलकांना देण्यात आले. यावेळी देवगाव गावात ठिकठिकाणी पाच पिंजरे तात्काळ लावले. आणि बिबट्या दिसलेल्या ठिकाणी वन विभागाच्या २५ हुन अधिक कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण मोहीम राबविली.
त्यानंतरही एका बिबट्याने शिक्षकावर हल्ला केला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत होते. आज पहाटे वाकद ते देवगांव शिवरस्ता येथे साहेबराव बाबूराव शिंदे यांच्या शेतात साधारण चार ते पाच वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी येवला राहुल घुगे, वनपाल मनमाड जयराम शिरसाठ, वनरक्षक विंचूर विजय दोंदे, माजी सैनिक अंकुश गुंड, आधुनिक बचाव पथक निफाड सागर दुसिंग, भारत माळी, विजय माळी, सादिक शेख, वैभव दौंड, शरद चांदोरे, मयुर गांगुर्डे समाधान चव्हाण यांनी तातडीने धाव घेत बिबट्या ताब्यात घेतला.
या परिसरात दोन बिबटे कैद झाले असले तरी अद्याप देखील बिबटे असल्याची नागरिकांना खात्री असून त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment