सततच्या अतिवृष्टीमुळे उगाव येथील द्राक्षेशेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
बेमोसमी कोसळणारा पाऊस तर कधी सुसाट वेगाचा वारा कधीही न बघितलेली गारपीठ ही द्राक्ष पंढरी उध्वस्त होण्याची मुख्य कारणे यामुळे शेती करायची कशी, पैसे फेडायचे कसे,मुलांचे शिक्षण, औषधाचा खर्च, खते,मजुरी कशी द्यायची हातातील शेतात ओतले कर्जबाजारी होऊन पीक उभे केले आणि निसर्गाने सर्व हिरावले यामुळे द्राक्षे शेतीतून उध्वस्त झालेल्या उगाव ता.निफाड येथील शेतकऱ्याने आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सधन मानल्या जाणाऱ्या द्राक्षे शेतीला कोरोना काळापासून ग्रहण लागले असून आता द्राक्षे उत्पादकही आत्महत्या करू लागल्याने द्राक्षे पंढरीत खळबळ उडाली आहे.
उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे हे आज सकाळी ८.३० च्या सुमारास द्राक्षे बागेत फेरफटका मारत असतांना त्यांना द्राक्षे बागेची उध्वस्त परिस्थिती पहावली नाही. त्यामुळे त्यांनी द्राक्षे बागेचे विषारी औषध सेवन केले. कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना तातडीने निफाड ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
संबंधित शेतकऱ्यावर बँक, सोसायटी व सावकारी कर्ज होते. हा द्राक्षे हंगाम चांगला जाऊन आपण कर्जमुक्त होऊ अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र द्राक्षे बागेची परिस्थिती पाहून सात आठ दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्षे पिकाचे सप्टेंबर महिन्यात द्राक्षे माल नसतांना पंचनामे केले व त्या आधारे तुटपुंजी मदत केली. त्यामुळे द्राक्षे हंगाम सुर झाल्याने सरकारने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment