कांदा उत्पादकांचा संताप उफाळला! दि.१० ऑक्टोबरला विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन




प्रतिनिधी - गणेश ठाकरे लासलगाव

- कांद्यास मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला असून या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिली आहे.

     सलग पाच महिन्यापासून उन्हाळी कांद्यास अत्यल्प दर मिळत आहेत. त्यातच आता रांगड्या कांद्यास अवघा दिडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव उत्पादन खर्चही भागवू शकत नाहीत, अशा स्थितीत शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. मे-जून महिन्यापासून कांदा साठवून ठेवलेला असून, बाजारात दर केवळ ६ ते ८ रुपये प्रतिकिलोच्या घरातच थांबले आहेत. त्यामुळे साठवणूक, मजुरी, वाहतूक अशा सर्व खर्चानंतर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने कांदा दरवाढ रोखण्यासाठी निर्यात बंदी, साठा मर्यादा यांसारखे निर्णय घेतल्याने बाजारपेठ कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, पंकज घोटेकर, अनिल घोटेकर, रामदास गवळी, भाऊसाहेब तासकर, समाधान घोटेकर, मंगेश घोटेकर, विनायक घोटेकर, पप्पू घोटेकर, नामदेव घोटेकर यांनी केले आहे.

◆ निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदी उठवावी आणि बाजार हस्तक्षेप योजना तात्काळ राबवावी, अशा मागण्या केल्या. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन केवळ विंचूरपुरते मर्यादित राहणार नाही; राज्यभर तीव्र स्वरूप धारण करेल.

No comments:

Post a Comment