कुहीत महसूल प्रशासनाची रस्ता अदालत २१ प्रकरणांपैकी १३ निकाली




स्वप्नील खानोरकर 

कुही : महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमांतर्गत कुही तहसील कार्यालयातील मुकुंदराज सभागृहात मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रस्ता अदालत’चे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित रस्ता संदर्भातील तक्रारी, विवाद व अर्जांची सुनावणी करून मार्ग काढण्याच्या उद्देशाने ही अदालत घेण्यात आली.

या रस्ता अदालतमध्ये एकूण २१ प्रकरणांची सुनावणी झाली. त्यापैकी काही प्रकरणे परस्पर समझोता व तडजोडीने मार्गी लावण्यात आली, तर काही प्रकरणे नियमांच्या चौकटीत राहून निपटविण्यात आली. यामध्ये एकूण १३ प्रकरणे निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्यात आला.या महत्वाच्या उपक्रमाचे मार्गदर्शन कुहीचे तहसीलदार अमित घाडगे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मनीषा देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत झाडे, नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या तर काहींनी तहसील प्रशासनाच्या पुढाकाराचे स्वागत केले. ग्रामीण पातळीवर रस्ता संदर्भातील तंटे हे अनेकदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असतात. मात्र अशा प्रकारच्या रस्ता अदालत कार्यक्रमांमुळे प्रशासन आणि जनतेतील दरी कमी होत असून, तक्रारींना जलद तोडगा मिळण्याचा मार्ग सुकर होत आहे.सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत रस्ता अदालत ही केवळ औपचारिकता नसून, प्रशासनाच्या कामकाजाला वेग देणारी आणि लोकांचा विश्वास जिंकणारी प्रक्रिया ठरत असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या रस्ता अदालतच्या निमित्ताने कुही तहसील प्रशासनाने दाखवून दिले की न्यायालयीन प्रक्रियेत न अडकता नियमबद्ध मार्गाने व आपसी समझोत्याच्या आधारे अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात.

No comments:

Post a Comment