मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

 


 कुहीत कुणबी युवकांचा तहसीलदारांमार्फत सरकारला इशारा


मूळ कुणबींच्या हक्कावर डल्ला मारला तर राज्यभर तीव्र आंदोलन पेटेल


कुही : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासनाचा निर्णय मूळ कुणबी समाजाला



मान्य नाही असा इशारा कुही तालुका अखिल कुणबी युवक मंडळातर्फे गुरुवारी तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला. शासनाने दबावाखाली येऊन हा निर्णय घेतल्यास राज्यातील कुणबी पेटून उठेल व तीव्र आंदोलन होईल असा इशाराही देण्यात आला.


कुही तालुक्यातील युवक मंडळाचे सदस्य तहसील कार्यालयात एकत्र जमले होते. त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी आरक्षण देऊ नये. मात्र स्वतंत्र आरक्षण दिल्यास कुणबी समाजाचा विरोध नाही तर समर्थन आहे.सरकारने लेखी आश्वासन द्यावे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही. तसेच केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात ठराव संमत करून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. हे निवेदन राजकीय नसून सामाजिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने जातीनिहाय जनगणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला तितकेच आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवावी,परराज्यातील लोकांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र मिळू नये. कुणबी प्रमाणपत्र फक्त मूळ कुणबी जातीतील व्यक्तींनाच द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.


कुणबी युवकांनी प्रशासनाला ठणकावले की मूळ कुणबी समाज हा शेतीप्रधान, कष्टकरी आणि मातीतून उभा राहिलेला समाज आहे. अशा समाजाच्या हक्कावर कुणाचाही डोळा जाऊ देणार नाही. शासनाने घेतलेला निर्णय कुणबींच्या अस्तित्वावर गदा आणणारा असल्याने तो त्वरित मागे घेण्याची गरज आहे. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन पेटेल असा इशाराही देण्यात आला.या प्रसंगी युवक मंडळाचे प्रभारी अध्यक्ष निखिल धानोरकर, दिनेश साळवे, प्रदीप शेंडे, आकाश केदार, मयूर ढेंगे, रमाकांत शेंडे, विलास पंचबुद्धे, निखिल खराबे, प्रेम बोरकर, महादेव आंबोने, गौरव साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


No comments:

Post a Comment