वरणगांव सिव्हिल सोसायटीतर्फे शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन
तालुका प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर
भुसावळ : वरणगाव सिव्हिल सोसायटीने दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हणजे आज १७ ऑगस्ट २०२५ रोजी कन्हैया हॉल, वरणगाव येथे 'पर्यावरणस्नेही गणपती मूर्ती बनविणे कार्यशाळा' आयोजित केली होती. डॉ.राहुल भोईटे सर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेत परिसरातील सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.विद्यार्थी व त्यांच्यासोबत उपस्थित पालकांमध्ये कमालीचा उत्साह यावेळी जाणवला. या कार्यशाळेत खिरोदा येथील सप्तपुट ललित कला महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य अतुल मालखेडे सर यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. यावेळी मुलांमध्ये बालपणापासून विविध कलागुण विशेषतः शिल्पकला विकसित व्हावी हा दृष्टिकोन रुजविण्यात आला. प्राचार्य अतुल मालखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती (शिल्प) बनविण्याच्या कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य मालखेडे सरांनी पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेश मूर्ती बनविताना विविध छोटी छोटी सामान्य टूल्स वापरून, बोटांचा सुरेख वापर करून, दाब देऊन मूर्तीत सुंदर आकार कसे तयार करता येतात याचे उत्तम प्रात्यक्षिक दाखविले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुंदर शिल्पकृतींचे (गणेश मूर्तींचे)त्यांनी यावेळी परीक्षण केले व विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने कौतुक व मार्गदर्शनही केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या व्यसनाधिनतेविषयी भेडसावत असलेल्या चिंतेवर सन्माननीय आनंदजी टिडोळे सर यांनी मार्गदर्शन केले. तर शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यामुळे पर्यावरणास हानी न पोहचविता आपण सण, उत्सव ,परंपरा कसे जोपासू शकतो यासह मुले व पालक यांच्या संदर्भातील विविध समस्यांवर सन्माननीय डॉ.राहुल भोईटे सर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. 'जलस्त्रोतांचे संरक्षण करूया,पर्यावरण वाचवूया' असा पर्यावरण संवर्धन संदेश या कार्यशाळेतून 'वरणगाव सिव्हिल सोसायटी' मार्फत देण्यात आला.
सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सिव्हिल सोसायटीचे सदस्य डॉ.राहुल भोईटे, आर एन पाटील, डॉ.अनुजा भोईटे, श्रद्धाताई चौधरी, डॉ.अनिल शिंदे, सदानंद जोशी, गोपाळ कळसकर, सचिन बेलोकार, रामचंद्र पाटील, अजय पाटील, दीपक सोनार, कमलेश येवले, राहुल सोनवणे, गोटूभाऊ न्हावी, आनंद टिडोळे,अक्षय भावसार, हेमंत पाटील, गोपाळ गावंडे, युवराज सूर्यवंशी,राजू गायकवाड, दीपक शिंपी आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment