मुलाची निसर्गप्रेमी मृतप्राय वडीलांना अनोखी भेट
कुही तालुका प्रतिनिधी– जितेंद्र गोंडाणे
किती झाडे लावली यापेक्षा किती झाडे जगवली हे महत्त्वाचे या संकल्पनेसह युवा समाजप्रबोधनकार व सप्तखंजेरीवादक आकाश टाले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला उभारी दिली. निसर्गवासी मुरलीधर टाले यांच्या वयाइतकी (५९) झाडे लावण्याच्या संकल्पापासून सुरुवात होऊन आतापर्यंत १८० फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.
मुरलीधर टाले हे कुही तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पबाधीत सावंगी (फेगड) येथील सेवाभावी, साधेपणा आणि माणुसकीच्या ओळखीने प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चिरंजीव आकाश टाले यांनी 'मुरलीबाग' नावाच्या वृक्षारोपण उपक्रमाद्वारे वडिलांना निसर्गमय आदरांजली वाहिली. हा उपक्रम केवळ संख्येपुरता मर्यादित न राहता, समाजाच्या सहभागामुळे एक चळवळ बनली.
जिल्हा परिषद शाळा जीवनापूर सोनेगाव, सावंगी, हनुमान मंदिर देवस्थान आणि बौद्ध विहार अशा विविध आंबा, चिकू, पेरू, सीताफळ, संत्री, मोसंबी, काजू, अंगूर यांसारख्या फळझाडांची रोपे लावण्यात आली. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापक हितेश रामटेके,गणपत धार्मिक,डाकराम नरुले व इतर शिक्षक-विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
कार्यक्रमात सरपंच सविता शिवरकर, उपसरपंच अनिल कुकुडकार,सौरभ आंबोणे, जगदीश बांते, रमाकांत शेंडे, मनोहर हारगुडे,खुशबू मेंडवाडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मुरलीधर टाले यांच्या सेवाभावी कार्याचा आणि आता 'मुरलीबाग'च्या रूपात त्यांच्या विरासतीचा गौरव केला.एक कुटुंब, एक झाड या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम केवळ पर्यावरणसंवर्धनाच नव्हे, तर भावनिक बंध,समाजजागृती आणि प्रेरणेचा झरा बनला आहे. आकाश टाले यांनी सांगितले की, झाडे लावणे हे फक्त संख्या नसते, तर ती जपणे ही खरी समाजसेवा आहे.
No comments:
Post a Comment