पाचकंदील चौकात रस्त्यावरच वाहनतळ? नियमांना बगल, पोलिस-नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक..!



 पुणे जिल्हा प्रतिनिधी: अविनाश घोगरे 

शिरूर शहरातील मुख्य बाजारपेठ व पाचकंदील चौक हे सध्या वाहनतळच बनलं आहे का ? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. येथील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर बिनदिक्कतपणे चारचाकी, दुचाकी पार्क केल्या जात असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, एका स्थानिक व्यापाऱ्याने तर थेट पार्किंगच्या जागेतच गाळे उभारून ती जागा व्यापून टाकली आहे.

प्रसारमाध्यमांत बातम्या झळकताच गाळ्यांमध्ये जाण्यासाठी बैलगाडा घाटासारखा जिना बनवून ‘पार्किंगची सोय आहे’ असा बनाव उभा करण्यात आला. पण प्रत्यक्षात बांधकाम परवानगी देताना पार्किंगचा विचारच करण्यात आला नाही का?नगरपालिकेचे संबंधित अधिकारी या गोष्टीकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहेत का ? असा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरपालिका अधिकारी, कर्मचारी व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे यामध्ये मलई खात असल्याचा आरोपही होत आहे.

बाजारपेठेत शिरूरसह श्रीगोंदा, पारनेर परिसरातून दररोज हजारो ग्राहक येत असतात. परंतु अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक कोंडीत सामान्य ग्राहक व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा पार्किंगच्या वादातून व्यापाऱ्यांशी वादविवादही होतात.

प्रश्न असा आहे की, रस्त्यावर बिनधास्तपणे गाड्या उभ्या करणाऱ्यांवर ना पोलिस कारवाई करत, ना नगरपालिका. वाहनांवर कधीही दंड ठोठावणारे पोलीस बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंग वर कारवाई का करत नाहीत? का पोलिसांना खरच समस्या दिसत नाही? नगरपालिका आणि पोलिस प्रशासन या गंभीर समस्येकडे डोळेझाक का करत आहे? नक्की पाणी कुठे मुरतंय? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.


No comments:

Post a Comment