वाहतूक कोंडीवर तोडगा..! शाळेजवळ चुकीचे पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा — पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा सजग इशारा...



पुणे जिल्हा प्रतिनिधी - अविनाश घोगरे 

शिरूर शहरातील प्रमुख शैक्षणिक संकुल असलेल्या विद्याधाम प्रशाला, विद्याधाम चौक, सी.टी. बोरा कॉलेज रोड व निर्माण प्लाझा परिसरात दररोज विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी व सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याबाबत गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी सांगितले की, "काही पालक आपल्या दुचाकी रस्त्यावर कोठेही थांबवतात, विरुद्ध दिशेने वाहन चालवतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते." यामुळे एस.टी. स्टँड कडून बाबुराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रोजच जामचा सामना करावा लागत आहे.

केंजळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पालकांनी आपली वाहने केवळ वाहतूक पोलिसांनी दर्शविलेल्या जागांवरच पार्क करावीत, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. यासाठी वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचना गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

यासोबतच शिरूर पोलिसांनी विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य यांच्यासोबतही चर्चा केली असून, वाहन चालकांसाठी अधिकृत पार्किंगची सोय उपलब्ध करून देणे, तसेच शाळेची सुट्टी टप्प्याटप्प्याने घेण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी गर्दी टाळता येईल आणि रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे केंजळे यांनी नमूद केले.

वाहतूक पोलिसांकडून लवकरच याबाबत प्रबोधन आणि उपाययोजना राबवण्यात येणार असून, नागरिकांचा सहकार्य अपेक्षित आहे. शिरूर शहरात सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील नागरिकांनी या आवाहनाची गंभीर दखल घेऊन नियमांचे पालन केल्यास, अपघातमुक्त आणि शिस्तबद्ध शिरूर घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल. पालकांची जबाबदारी ही केवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपुरती मर्यादित नसून, इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचीही तीव्र जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment