राही फौंडेशनतर्फे सामाजिक भान दाखवत आरोग्यविषयक मार्गदर्शन; डॉ. सुनिताताई पोटे यांचे स्तुत्य योगदान.!
![]() |
माहेर संस्थेतील हाऊस मदर यांना आरोग्य मार्गदर्शन, तर विवाहोत्तर मुलींना मोफत डिलिव्हरीची हमी.. |
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
राही फौंडेशनच्या वतीने डॉ. सुनिताताई पोटे यांनी वढू येथील 'माहेर संस्था' येथे एक अत्यंत आशयसंपन्न आणि सशक्त आरोग्यविषयक सत्र घेऊन, संस्थेतील हाऊस मदर (पालकत्व निभावणाऱ्या महिला) यांना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले
या मार्गदर्शनादरम्यान डॉ. पोटे यांनी महिलांनी दररोज योगा, व्यायाम आणि ध्यानधारणा (Meditation) करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी संतुलित आहार, नियमित जीवनशैली आणि मानसिक आरोग्य जोपासण्याचे मोलाचे महत्त्व विशद केले. "शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक समतोल राखणे काळाची गरज आहे," असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राही फौंडेशनतर्फे माहेर संस्थेतील विवाहोत्तर मुलींच्या मोफत प्रसूतीची (डिलिव्हरी) सुविधा शिरूर येथील पोटे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. सुनिताताई पोटे व डॉ. संतोष पोटे यांनी दिले. या निर्णयाने अनेक गरजू महिलांना मोलाचा आधार मिळणार आहे.
या स्तुत्य उपक्रमासाठी शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेविका कविताताई वाटमारे, पाटबंधारे विभागातील मनीषाताई साळुंके यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास माहेर संस्थेच्या संस्थापिका-संचालिका सि. लुसी कुरियन, अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला, मिनी एम.जी., स्वाती पाटील, आथिना नायर, समीक्षा मुळे, शलीदिदी, सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी व रमेश दुतोंडी हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेर संस्थेतील सर्व हाऊस मदर, ज्यांच्या प्रेमळ सहवासात व देखरेखीखाली अनेक निराधार मुली घडत आहेत, त्यांना मन:पूर्वक सलाम करण्यात आला.
राही फौंडेशनचा हा उपक्रम म्हणजे केवळ आरोग्यदायी सल्ला नव्हे, तर जिव्हाळ्याचं सामाजिक योगदान ठरले आहे. समाजात अशा संवेदनशील उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, हेच या कार्यातून अधोरेखित झाले आहे.
समाजातील प्रत्येक महिला आरोग्यदृष्ट्या सक्षम झाली, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सशक्त होईल, हे डॉ. पोटे यांचे खरे ध्येय आहे आणि ते त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येते.
No comments:
Post a Comment