परराज्यात महिलेची व्यापारासाठी विक्री करणाऱ्या टोळीचा स्मिता म्हसाय यांनी केला पर्दाफाश
आईसह दोन मुलांची सुटका; दोन महिलांसह पाच आरोपी गजाआड
मलकापूर पोलिस ठाण्यात श्रीकृष्ण निळकंठ राणे (वय ५०, रा. धरणगाव, सध्या रा. दीपकनगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाय यांच्या पथकाने महिलेची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा १५ दिवसात पर्दाफाश केला आहे.
मलकापूर तालुक्यातील एका व्यक्तीने त्यांच्या दोन नातवांचे अपहरण झाल्याची तक्रार मलकापूर पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जून रोजी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलांची आई पतीसह मध्य प्रदेशात रोजगारासाठी गेली. तिथे तिचा संपर्क कंत्राटदार ब्रिजेशकुमार जुझारसिंग विश्वकर्मा (वय ३२, रा. यशदा, ता. नटरेज, जि. विदिशा) याच्याशी आला. त्यानेच तिला दोनदा विकले. मात्र, ती कशीबशी पळून आली. तिच्या पाठीमागे ब्रिजेशकुमार हा मलकापुरात आला. त्याने पीडित मुलांना पळविले. परंतु, मुलांच्या सुटकेसाठी पीडित मुलांच्या आईने पोलिसांना घटनाक्रम सांगितला. या महिलेने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाय यांच्या पथकाने पुढील तपास सुरू केला.
तिने दिलेल्या माहितीवरून पोलीसही थक्क झाले. ब्रिजेशकुमार जुझारसिंग विश्वकर्मा याने या महिलेला दोनदा अनैतिक व्यापारासाठी विकले होते, असे तिने सांगितले मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. त्या दरम्यान आरोपी ब्रिजेशकुमार उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने जलद गतीने उत्तर प्रदेशातील मथुरा गाठले व तीन वर्षीय अपहृत मुलाला मथुरेतून ताब्यात घेतले. तर दुसन्या सात वर्षीय मुलाला मुख्य आरोपी ब्रिजेशकुमार विश्वकर्मा याच्यासह भोपाळ येथून ताब्यात घेतले. मुलांसह पोलीस पथक ३१ जुलै रोजी परतले. आरोपीला गजाआड करण्यात आले. त्याला १५ दिवसांच्या पोलिस कोठडी मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची आधी दोन लाख रुपयांत गुजरातमधील पाकिस्तान सीमेलगत कच्छ-भूज येथे विक्री केली. आरोपी सतीश लालबहादूर राजपूत (वय २७, रा. आंतरजाल आदीपूर, ता. गांधीधाम, कच्छ-भूज) याला दुसऱ्यांदा २ लाख ६० हजारांत विक्री झाली असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक स्मिता म्हसाय यांनी इंद्रसिंह संतोष पाटील (४३, रा. खडके, ता. एरंडोल, जि. जळगाव खांदेश) याला अटक केली. कोठडीत मुख्य आरोपी ब्रिजेशकुमार विश्वकर्मा याला पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने काही महिलांबाबत माहिती दिली. पोलिसांनी जयाबाई उर्फ छाया नारायण सावंत (वय ४३, रा. व्ही. के. कॉम्प्लेक्स, घर क्रमांक ३११, सूरत, गुजरात) व वनिता उर्फ अनिता राधामोहन सावंत (वय ५४, रा. मोहनपुरा, छोटा बाजार पोलिस चौकी, मलकापूर) या दोघींना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. हे पाचही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाय यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, ज्ञानेश्वर शिवाजी मुळे, ईश्वर वाघ, प्रियंका डहाके, प्रमोद राठोड, आसिफ शेख यांनी केली. या आरोपींविरोधात कलम ३ (१), अपन २९८ / २०२३ कलम ३६३ भादंवि सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ ४ (१), ५ (१) (क) (ग) (घ) ५ (२) ६ (१) या गुन्ह्यात बाल न्याय कायदा (ज्युवेनाईल जस्टीस अॅक्ट २०१५) चे कलम ७५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक दिवसांपासून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता माझ्यासह मलकापूर पोलीस पथकाने परिश्रम घेतले. त्यामुळे पाच आरोपींना गजाआड करण्यात आम्हाला यश प्राप्त झाले. या दरम्यान मुलांसह आईची सुटका आणि आरोपींना अटक हाच माझा केंद्र बिंदू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवई, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे जलदगतीने तपासाला वेग आला आणी महिलेची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.- स्मिता म्हसाय, सहायक पोलीस निरीक्षक, मलकापूर शहर पोलिस ठाणे
No comments:
Post a Comment