'समाजसेवक सैय्यद नवाज नजिर यांच्या हस्ते बनोटी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप'
(वैभव कळस )
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी संवाद; गुणवंत विद्यार्थ्याचाही गौरव'.
म्हसळा तालुक्यातील स्वच्छ व सुंदर शाळा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बनोटी येथे समाजसेवक मा. सैय्यद नवाज नजिर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयसिंग बेटकर, अंगणवाडी मदतनीस सौ. वासंती गाणेकर, श्री. अजित कांबळे, सौ. लक्ष्मी कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षणाविषयी विशेष जिव्हाळा असलेल्या सैय्यद नवाज नजिर यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि गोड खाऊचे वाटप केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या शैक्षणिक प्रवासातील आठवणी सांगताना त्यांनी सन १९८० पूर्वी म्हसळा शहरात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने पदवीचे शिक्षण घेण्यासाठी महाड येथे जावे लागत असे, असा शैक्षणिक इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. कठोर परिश्रम, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर जीवनात यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
याच कार्यक्रमात बनोटी गावातील गुणवंत विद्यार्थी ओम म्हात्रे याने इयत्ता अकरावी कला शाखेत ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सैय्यद नवाज नजिर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने समाजसेवक सैय्यद नवाज नजिर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि जिल्हा परिषद शाळांप्रती समाजात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment