जि. प. शाळा सुरोडीच्या नवीन इमारतीसाठी आमदारांना निवेदन; लिलावानंतर नवीन खोल्या मंजुर करण्याची ग्रामस्थांची मागणी



**श्रीगोंदा (प्रतिनिधी):**

सुरोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जुनी आणि जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीचे निर्लेखन (डीमॉलिश) करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नुकताच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जुन्या इमारतीचा लिलाव यशस्वीरीत्या पार पडला आहे. आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी लवकरात लवकर नवीन खोल्या मंजूर कराव्यात, अशी मागणी सुरोडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात सुरोडी येथील सामाजिक कार्यकर्ते कचरूसेठ वागसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वागसकर व मुख्याध्यापक लगड गुरुजी यांनी तालुक्याचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार माननीय विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन त्यांना रीतसर निवेदन दिले.

शाळेची जुनी इमारत पाडल्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्यासाठी अडचणी निर्माण होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर आमदार विक्रम पाचपुते यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन शाळा खोल्यांच्या मंजुरीसाठी सकारात्मक पाठपुरावा करून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment