हिंगोली येथे महिला दक्षता समितीची बैठक महिला व बालकांच्या संरक्षणासाठी समन्वयावर भर
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची बैठक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभरोहन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यातील सर्व १३ पोलीस ठाणे अंतर्गत नेमण्यात आलेल्या महिला दक्षता समितीच्या सदस्य व सचिवांनी या बैठकीत सहभाग घेतला.
महिलांविरुद्धच्या तक्रारींची तात्काळ दखल घेणे, पीडित महिला व मुलींशी संवेदनशीलतेने वागणे, तसेच त्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे
यासाठी समाजातील विविध घटकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बैठकीत मानसोपचार तज्ञ डॉ. दीपक डोंगेकर, विधी अधिकारी अनुसया पंडित आणि केंद्रीय शाळेच्या शिक्षिका मीरा गनणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिला व बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्यापासून ते मानसिक पाठबळ, वैद्यकीय मदत, निवारा आणि इतर सहाय्य देण्यात महिला दक्षता समितीची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी महिला दक्षता समितीच्या कार्याचा आढावा घेत महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक (गृह), महिला पोलीस निरीक्षक, जिल्ह्यातील सर्व महिला दक्षता समिती सदस्य, सचिव, दुय्यम अधिकारी तसेच महिला पोलीस अंमलदार उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रेमलता जगताप यांनी केले. भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment