परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली
कळमनुरी मतदारसंघात तिरंगी लढतीची चर्चा
प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी
कळमनुरी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी मोचेर्बाधणी सुरू केली असून कळमनुरी तालुक्यात निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख नावे चर्चेत असून लढत चुरशीची होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत विद्यमान संचालक तथा माजी खासदार शिवाजीराव माने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले अभय पाटील सावंत यांची नावे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
दरम्यान, अभय पाटील सावंत यांनी आमदार संतोष बांगर व आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. दुसरीकडे, विद्यमान संचालक म्हणून शिवाजीराव माने यांचा अनुभव आणि सहकार क्षेत्रातील कामाचा ठसा त्यांच्यासाठी जमेची बाजू मानला जात आहे. तर बाळासाहेब मगर यांनीही संघटनात्मक ताकदीच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे.
कळमनुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे वजन टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांचे समर्थक आपापल्या पातळीवर प्रचाराची तयारी करत असून राजकीय समीकरणांना वेग आला आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी होत असलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून तिरंगी लढतीमुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विद्यमान संचालकांचा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि राजकीय पाठबळ या तिन्ही घटकांची कसोटी या निवडणुकीत लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, शिवाजीराव माने आपले वर्चस्व कायम राखणार, बाळासाहेब मगर संघटनशक्तीच्या बळावर बाजी मारणार की अभय पाटील सावंत नव्या समीकरणांसह विजयश्री खेचून आणणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment