गायगोठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; रिपब्लिकन सेनेचे निवेदन, सोयगाव पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा
लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी, पात्र अर्जदारांना मंजुरी नाकारल्याचा आरोप; पुराव्यांसह चौकशीची मागणी
प्रतिनिधी सोयगाव...दिलीप मोरे..
तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या गायगोठा योजनेत अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेना सोयगाव तालुका अध्यक्ष अंकुश मधुकर पगारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांनुसार, काही लाभार्थ्यांकडून आर्थिक व्यवहार करूनच कामे मंजूर केली जात असल्याचे सांगितले आहे. तसेच ज्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले आहेत, अशा पात्र लाभार्थ्यांच्या फाईली प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर अपूर्ण किंवा संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे काही लाभार्थ्यांची कामे मंजूर झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
यासोबतच लाभार्थ्यांचे फोटो काढणे, तांत्रिक पडताळणी आणि मंजुरी प्रक्रियेतही अनियमितता होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व बाबींचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे अंकुश पगारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच तालुक्यातील संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या समस्या व तक्रारींसह आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आरोपांबाबत पंचायत समिती प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्रशासनाकडून प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

No comments:
Post a Comment