गुणांपलीकडचे शिक्षण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एडुसन फाऊंडेशनचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
नागपूर, दि. ८ जुन २०२६ : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, नेतृत्वगुण आणि उद्योजकीय विचारसरणी विकसित होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून एडुसन फाऊंडेशन (Edusan Foundation) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. फाऊंडेशनच्या Edusan Academy या शैक्षणिक व्यासपीठामार्फत ८वी ते १२वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आधारित कौशल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योजकतेचे धडे देणे हा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या आणि क्षमतेच्या क्षेत्राची ओळख करून देत त्यांना भविष्यातील करिअर निवडीसाठी सक्षम बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, डिजिटल कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये, नेतृत्व विकास, आर्थिक साक्षरता तसेच उद्योजकता विकास यांसारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. आज अनेक विद्यार्थी शिक्षण आणि करिअर निवडीबाबत संभ्रमित असतात. पालक आणि विद्यार्थ्यांवर वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे तणाव निर्माण होतो. एडुसन फाऊंडेशनचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र शोधण्यास मदत करेल आणि शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील ताण-तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांच्यानुसार, “विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षांमध्ये गुण मिळविण्यावर भर न देता जीवनासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. इंटर्नशिप आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळेल.”
एडुसन फाऊंडेशनचा विश्वास आहे की, विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयात कौशल्य विकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन निर्माण केल्यास ते भविष्यात रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे नागरिक बनू शकतात.
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment