योग शिबिराची यशस्वी सांगता; ‘हर दिन योगा, हर घर योगा’ची महिलांनी घेतली

 



प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

योग असोसिएशन निफाडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय योगशिबिराची सांगता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उत्साहात करण्यात आली. विशेष म्हणजे समारोप प्रसंगी उपस्थित सर्व महिलांनी ‘हर दिन योगा, हर घर योगा’ ही शपथ घेऊन नियमित योगाभ्यासाचा संकल्प केला.

     या शिबिरामध्ये प्राणायाम साधना, प्राणाकर्षण क्रिया, विविध उपयुक्त उभी व बैठी आसने, नमन मुद्रा, सिंह मुद्रा, अश्विनी मुद्रा तसेच मूलबंध व जिव्हाबंध याविषयी सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके योग असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा डेर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आसनक्रिया व सूक्ष्म व्यायामांचाही सराव करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आय.एफ.एस अधिकारी दर्शन सूर्यवंशी यांनी महिलांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत आरोग्य जपण्याचा संदेश दिला. तर डॉ.सीमा डेर्ले यांनी, प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असून तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असते. महिला निरोगी व तंदुरुस्त राहिल्यास कुटुंब आणि पर्यायाने समाजही सुदृढ होण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. वैनतेय विद्यालयाच्या माजी प्राचार्या मालती वाघावकर यांनी प्रास्ताविकात, स्वतःच्या शरीराला व मनाला न्याय देण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचे आवाहन केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया चोरडिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन चित्रा जेऊघाले यांनी केले. मनिषा वाघ, संगीता शिंदे व प्रसन्ना कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली.

शिबिरात लीना छाजेड, पूजा मगर, आरती व्यवहारे, पल्लवी बिनायकीया, शकुंतला धारराव, खालकर, श्रीवास्तव, सोनाली व्यवहारे, आशाताई पंडित, चव्हाण, शैला व्यवहारे, दीप्ती तिवारी, नेहा कडलग, सुरेखा भोई, मनिषा व्यवहारे, नेहा सोनवणे, वैशाली सोनवणे आदी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोपाच्या वेळी सर्व महिलांनी ‘हर दिन योगा, हर घर योगा’ ही शपथ घेऊन योगाचा प्रसार घराघरांत करण्याचा निर्धार व्यक्त केला.


No comments:

Post a Comment