अधिक मासाच्या स्नानादरम्यान दुर्दैवी दुर्घटना; आई-मुलाचा मृत्यू, दोन महिला गंभीर
प्रतिनिधी : गजानन चव्हाण
मूर्तिजापूर, दि. ११ जून : अधिक मासानिमित्त काटेपूर्णा नदीपात्रात स्नानासाठी गेलेल्या महिलांच्या समूहावर गुरुवारी सकाळी दुर्दैवाचा डोंगर कोसळला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने झालेल्या दुर्घटनेत एका आईसह तिच्या चिमुकल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बचावासाठी धावलेल्या दोन महिलांवर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, समशेरपूर येथील सुमारे १० ते १५ महिला गुरुवारी पहाटे अधिक मासानिमित्त मंगरूळ कांबे डॅम परिसरातील काटेपूर्णा नदीपात्रात स्नानासाठी गेल्या होत्या. स्नान सुरू असताना काही महिला अचानक खोल पाण्यात गेल्याने गोंधळ उडाला.या घटनेत ऋषाली हरिदास खोत (३५) व त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (१०) हे पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडाले. उपस्थित महिलांनी व ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र दोघांनाही जीव गमवावा लागला.गावावर शोककळा
आई आणि मुलाचा एकाच वेळी झालेला मृत्यू समशेरपूर गावासाठी मोठा धक्का ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील वातावरण हळहळीचे झाले आहे.जीव वाचविताना स्वतःच संकटात दरम्यान, बुडणाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मिराबाई श्यामसुंदर चौधरी (४५) व माधुरी उमेश खोत (३५) यांनाही पाण्याचा फटका बसला. गंभीर अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघींना अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.सुरक्षा उपायांची मागणी घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेनंतर डॅम व नदीपात्र परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. धोकादायक भागांमध्ये इशारा फलक, संरक्षक रेलिंग तसेच सण-उत्सव व धार्मिक कालावधीत विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मंगरूळ कांबे डॅम परिसरातील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून आई-मुलाच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

No comments:
Post a Comment