​'वर्दीमधील आपला माणूस' पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मूर्तिजापूर वासियांकडून भावपूर्ण निरोप!

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

"कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी, 'वर्दीमधील आपला माणूस' म्हणून ओळख निर्माण केलेले पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव सर यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कधीही बडेजाव न दाखवता, सर्वसामान्यांप्रमाणे राहून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. अधिकारी येतात आणि जातात, परंतु अधिकारी मधला खरा 'माणूस' मूर्तिजापूरकरांनी त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच पाहिला," असे गौरवोद्गार शांतता समितीच्या सदस्यांनी काढले. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एका भावपूर्ण समारंभात पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना निरोप देण्यात आला.​मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमधील त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आणि जनतेशी समन्वय ठेवणारी ठरली. त्यांची ही कारकीर्द सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. निरोप समारंभाप्रसंगी उपस्थित नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी जाधव सरांचा शॉल व श्रीफल देऊन जाहीर सत्कार केला, तसेच कोल्हापूर येथील नवीन नियुक्तीबद्दल आणि पुढील भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.​जाधव सर झाले भावुक ​सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक अजित जाधव कमालीचे भावुक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, "मी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी नोकरी केली, परंतु मूर्तिजापूर शहर खूपच चांगले आहे. येथील प्रत्येक नागरिकाने आणि सहकाऱ्याने मला अतोनात प्रेम दिले आणि माझ्या शासकीय कर्तव्यात मोलाची मदत केली. मूर्तिजापूर आणि येथील माणसांना मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही." सरांचे हे उद्गार ऐकून उपस्थित असलेले अनेक सहकारी आणि नागरिकही भावुक झाले होते.​प्रमुख उपस्थिती

​या ऐतिहासिक निरोप समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विष्णू लोडम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मूर्तिजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून पी.एस.आय. राजू वानखडे, पी.एस.आय. नितीन राठोड आणि पी.एस.आय.  गणेश सूर्यवंशी हे  उपस्थित होते.​तसेच पि.एस.आय गणेशजी सूर्यवंशी सर यांची पण बदली झाली त्यांचा पण सर्वानी शॉल श्रीफल देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमाला मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड अधिकारी, शांतता समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू तसेच जाधव सरांचा मोठा चहाता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण परिसर 'जाधव सर, तुमची आठवण नेहमी येईल' या भावनेने भारावून गेला होता.

No comments:

Post a Comment