‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ : अनसिंगमध्ये पर्यावरण दिनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संकल्प


*ग्रामसभेत नागरिकांनी घेतली शपथ; ‘एक पेड मॉ के नाम, एक पेड बेटी के नाम’ उपक्रमाचे आवाहन


नारायण सातव अनसिंग प्रतिनिधी

 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनसिंग ग्रामपंचायतीमध्ये गुरुवारी ( ता.५ ) विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ‘दरडोई किमान दोन झाडे लावून त्यांचे संवर्धन करू’ असा संकल्प करत नागरिकांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ची शपथ घेतली. यावेळी शासनासोबत नागरिकांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी हाक मान्यवरांनी दिली.

मानवी हस्तक्षेपाने निसर्ग कोपला : प्रशासकांची खंत

ग्रामपंचायत प्रशासक शे. जलील शे. रऊफ यांनी चिंता व्यक्त केली. “मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडला असल्याने निसर्ग कोपला आहे. वन्यप्राण्यांच्या त्रासाला आणि माकडांच्या हैदोसाला कंटाळून शेतकऱ्यांनी बांधावरील हजारो झाडे तोडली. शहरीकरणाच्या नावाखाली रोज लाखो वृक्षांची कत्तल होत आहे. शहरांमध्ये औद्योगिकीकरणामुळे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वाढून निसर्गाचे चक्र बिघडले आहे. सूर्य आग ओकत असल्याने मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे विकासाचे धोरण आखताना निसर्गाचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “घनकचऱ्यावर प्रक्रिया, घातक वायू गळतीला आळा, वाहन-कारखान्यांच्या धुराची तपासणी, नदी-नाले-तलावांचे प्रदूषण रोखणे या उपायांची अंमलबजावणी गरजेची आहे. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन विकासकामांना चालना दिली तर योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरतील व गाव समृद्ध होईल. यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”


निधी अपुरा, पाठबळ आवश्यक : ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत अधिकारी मुसळे यांनी ‘माझी वसुंधरा’ योजनेवर भाष्य केले. “लोकसंख्येच्या प्रमाणात निधी अपुरा पडत असल्याने विकासकामे करताना अडचणी येतात. गाव सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी स्थानिक नागरिकांचे पाठबळ आवश्यक असते. त्यांच्या सहकार्यानेच शासनाच्या योजना राबविल्या जातात. पाठबळ मिळाले नाही तर योजना कागदावरच राहून गाव अधोगतीकडे जाते. याकरिता सामाजिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनीच पुढे यावे लागेल,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘एक पेड मॉ के नाम’ – घरापासून सुरुवात करा* 

“पर्यावरण दिनाची सुरुवात घरापासूनच करा. ‘एक पेड मॉ के नाम, एक पेड बेटी के नाम’ लावून त्याचे संवर्धन केले तरच पर्यावरण दिन सार्थकी लागेल,” असे आवाहन मुसळे यांनी केले. परसबाग तयार करणे, पाणी आडवा-पाणी जिरवा योजना राबवून फळबाग लावणे, विजेचा व पाण्याचा अपव्यय टाळणे, कागदी पिशव्या, चामडी पादत्राणे यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचे लघुउद्योग सुरू करून स्वयंरोजगार निर्मिती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.


विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास

सध्या गरज नसतानाही राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. वाशिम जिल्ह्यात महामार्गालगत लावलेली झाडे संबंधित यंत्रणा जगवू शकली नाही. यातून शासनाची पर्यावरणाबाबतची उदासीनता दिसून येते.

 शतक जुनी झाडे नष्ट, वनविभागाचे दुर्लक्ष 

सर्वत्र मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल सुरू आहे. शंभर-दीडशे वर्षे जुनी झाडे नष्ट केली जात आहेत. वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.

No comments:

Post a Comment