वाळूजमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची मोठी कारवाई; परिसरात दहशतीचे वातावरण, स्थानिकांमध्ये संताप



वाळूज, प्रतिनिधी  पांडुरंग गायकवाड : दैनिक दर्पन वृत सेवा 

वाळूज औद्योगिक परिसरातील शिवाजीनगर भागात केंद्रीय तपास यंत्रणेने टाकलेल्या छापेमारीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली असली तरी अधिकृत पातळीवर कोणतीही माहिती देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याने संशय अधिकच गडद होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून वाळूज परिसरात तळ ठोकून होते. शुक्रवारी शिवाजीनगर परिसरातील एका ठिकाणी तब्बल दहा तास चौकशी आणि तपास सुरू होता. या काळात परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस बंदोबस्त, तपास यंत्रणेची वाहने आणि अधिकाऱ्यांची सततची वर्दळ यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले.

दरम्यान, वाळूजलगत असलेल्या काही नामांकित औद्योगिक आस्थापनांमध्ये कामगार भरती प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनी व्यवस्थापन हे कामगारांची पार्श्वभूमी, कागदपत्रे किंवा इतर आवश्यक पडताळणी न करता फक्त मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी परप्रांतीय कामगारांची भरती करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच स्थानिकांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा बेजबाबदार भरती प्रक्रियेचे परिणाम परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित आस्थापना व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात लवकरच एका सामाजिक संघटनेकडून संबंधित उद्योग, कॉन्ट्रॅक्टर आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच कामगार भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली जाणार असल्याचे समजते.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाळूज औद्योगिक परिसरातील घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी वाळूज परिसरात भीती, उत्सुकता आणि चर्चांचे वातावरण कायम आहे. 

No comments:

Post a Comment