सासरच्या पाठबळावर माधुरी नाठे यांची भरारी; महसूल सहाय्यकपदी निवड



प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सासर, भारतीय सैन्यात देशसेवा बजावणारे पती, तसेच सासू - सासरे आणि संपूर्ण कुटुंबाने दिलेल्या भक्कम पाठबळाच्या जोरावर माधुरी निवृत्ती नाठे यांनी महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

       सून नव्हे, तर मुलगी मानत सासरच्या मंडळींनी त्यांच्या शिक्षणाला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला दिलेली साथ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. माधुरी यांचे माहेर सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या माधुरी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. आई वनिता खताळे यांनी मजुरी करत, तर वडील वाळीबा कृष्णा खताळे यांनी शेती करून मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणाची ओढ त्यांनी कायम जपली.

पुढे त्यांनी नाशिक येथे डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निफाड तालुक्यातील चांदोरी येथील निवृत्ती दिलीप नाठे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. पती निवृत्ती नाठे हे भारतीय सैन्यात कार्यरत असून, देशसेवेबरोबरच पत्नीच्या स्वप्नांनाही त्यांनी तितकेच महत्त्व दिले. 'तू अभ्यास कर, पुढे जा' हा त्यांचा विश्वास माधुरींसाठी मोठी ताकद ठरला. सासूबाई सुमन नाठे, सासरे दिलीप नाठे, भाऊजी सोपान नाठे आणि जाऊ अनुराधा नाठे यांनीही माधुरी यांना मुलीसारखी माया दिली.

 अभ्यासासाठी आवश्यक ते सर्व वातावरण घरच्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलगा स्वरूपची संपूर्ण जबाबदारी कुटुंबाने स्वीकारली. त्यामुळे माधुरी यांना निश्चिंतपणे अभ्यास करता आला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.टेक. (पॉलिमर) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमपीएससीची वाट निवडली. पुण्यात राहून त्यांनी कठोर परिश्रम घेतले. दोन वेळा अपयश आले, मात्र त्यांनी हार मानली नाही. नाशिक येथील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत ऑनलाइन मार्गदर्शन घेत तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी महसूल सहाय्यक पदावर यश मिळवले.


° माझ्या सासूबाईंनी मला कधीच सून म्हणून वागवलं नाही; त्यांनी नेहमी मुलगी म्हणूनच जपलं. पती, सासू - सासरे, भाऊजी व जाऊबाई यांनी माझ्या स्वप्नांना आपलं मानून प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या विश्वास, प्रेम आणि पाठबळामुळेच आज मी हे यश संपादन करू शकले.- माधुरी नाठे 


No comments:

Post a Comment