मशागतीच्या तोंडावर इंधनटंचाई; सावळदबारात डिझेलसाठी शेतकरी-वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा




सोयगाव प्रतिनिधी..दिलीप मोरे...


सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे सध्या डिझेल-पेट्रोल टंचाईचे गंभीर चित्र पाहायला मिळत असून लक्ष्मणराव कोलते पेट्रोलियम पंपावर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. “आलं का डिझेल… आलं का पेट्रोल…?” असा प्रश्न विचारत नागरिक आणि शेतकरी तासन्तास प्रतीक्षा करताना दिसत आहेत.


सावळदबारा परिसरातील १२ ते १८ गावांतील हजारो शेतकरी व वाहनधारक या पंपावर अवलंबून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. उपलब्ध होणारा डिझेल-पेट्रोलचा साठा अवघ्या काही तासांत संपत असल्याने नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. नागरटी, टिलर, रोटावेटर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची तयारी सुरू असताना वाढते इंधनदर आणि टंचाईमुळे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत होत आहे. पूर्वीसारखी बैलजोडी नसल्याने बहुतांश शेतकरी पूर्णपणे यांत्रिकीकरणावर अवलंबून झाले आहेत.


दरम्यान, देऊळगाव गुजरी, लालमाती व बुलढाणा-गिरडा रोड परिसरातील पंपांवरही अशीच परिस्थिती असल्याने सावळदबारा येथे वाहनांची संख्या अधिक वाढत आहे. अनेक ट्रॅक्टर चालकांनी “डिझेल उपलब्ध करून दिल्यासच मशागत करू,” अशी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.


आधीच मका, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि कपाशी पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात वाढती महागाई, इंधनदरवाढ, खत-बियाण्यांचे वाढलेले दर आणि इंधनासाठी लागणाऱ्या रांगांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.


“कधी केवायसीसाठी रांग, कधी खतासाठी रांग आणि आता डिझेलसाठी रांग,” अशी प्रतिक्रिया अनेक वाहनधारकांनी व्यक्त केली. मशागतीची वेळ हातातून निसटू नये आणि पेरणीपूर्व तयारी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.




No comments:

Post a Comment