वर्चस्वासाठीची झुंज जीवावर बेतली; देव्हारी शिवारात वृद्ध बिबट्या मृतावस्थेत
प्रतिनिधी सोयगाव..दिलीप मोरे...
अजिंठ्याच्या काळ्याकभिन्न डोंगररांगा, गिरडा घाटातील दाट अरण्य आणि रात्रीच्या शांततेला चिरत फिरणाऱ्या बिबट्यांच्या डरकाळ्या… या जंगलात सध्या सुरू आहे वर्चस्वाची अदृश्य पण भीषण लढाई. “या जंगलाचा खरा राजा कोण?” या प्रश्नावरून दोन बिबट्यांमध्ये झालेल्या जीवघेण्या संघर्षात एका वृद्ध बिबट्याचा अत्यंत वेदनादायी अंत झाल्याची घटना देव्हारी शिवारात उघडकीस आली आहे.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, अजिंठा वन परीक्षेत्रातील जंगलात काही दिवसांपूर्वी दोन नर बिबट्यांमध्ये जोरदार झुंज झाली. या संघर्षात तरुण आणि ताकदवान बिबट्याने अंदाजे १२ ते १३ वर्षे वयाच्या वृद्ध बिबट्यावर प्राणघातक हल्ला चढवला. जंगलातील अधिवास, शिकार क्षेत्र आणि वर्चस्व टिकवण्यासाठी ही झुंज झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या हल्ल्यात वृद्ध बिबट्याच्या पुढील पंजातील नखे पूर्णपणे तुटली होती. अंगावर खोल जखमा, नखांचे ओरखडे आणि दातांचे चावे स्पष्ट दिसून आले. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, बिबट्यासाठी पंजातील नखे म्हणजे त्याचे सर्वात मोठे अस्त्र असते. नखेच तुटल्याने त्याची शिकार करण्याची क्षमता जवळपास संपुष्टात आली होती.
भूक, वेदना आणि जगण्यासाठीची शेवटची झुंज
जखमी अवस्थेत अनेक दिवस जंगलात भटकंती करत असलेला हा वृद्ध बिबट्या उपासमारीने कमकुवत होत गेला. शिकार करता येत नसल्याने अखेर तो जंगल सोडून शेतशिवाराच्या दिशेने आला. देव्हारी शिवारातील गट क्रमांक ३९ मधील नदीपात्राजवळ दि १३ ला सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
स्थानिक शेतकऱ्यांनी नदीकाठी मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याला पाहताच वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक आणि पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.
शवविच्छेदनातून धक्कादायक निष्कर्ष
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत, “दोन बिबट्यांच्या संघर्षात गंभीर जखमी झाल्याने आणि पंजांची नखे तुटल्याने बिबट्याला शिकार करता आली नाही. त्यामुळे उपासमार, अशक्तपणा आणि जखमांच्या तीव्र वेदनांमुळे त्याचा मृत्यू झाला असावा,” असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
अजिंठा परिसरात वाढता बिबट्यांचा दबदबा
अजिंठा डोंगररांग, गिरडा घाट आणि लगतच्या जंगल भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांची संख्या वाढल्याचे वन विभागाच्या निरीक्षणात आले आहे. जंगलातील अधिवास कमी होणे, पाणवठ्यांवर वाढलेली स्पर्धा आणि शिकार क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांमुळे बिबट्यांमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.
वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून शेतकरी व नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जंगलातील हा “निसर्गाचा नियम” असला तरी, एका वृद्ध शिकाऱ्याचा झालेला असा करुण अंत अनेकांना अस्वस्थ करून गेला आहे.

No comments:
Post a Comment