कोठडीतील आरोपींना घरचे जेवण व फॅन पुरवणे पडले महागात कळमनुरीतील पोलीस जमादार निलंबित



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपींना बेकायदेशीररीत्या घरचे जेवण व इतर सुविधा पुरवल्याप्रकरणी पोलीस जमादार जगन माणिक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सोमवारी (दि.२५ मे) काढले.

कळमनुरी शहरात २३ मे रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सहा आरोपींपैकी चार आरोपींना अटक केली होती. सदरील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. नियमानुसार कोठडीतील आरोपींना जेवण व आवश्यक सुविधा दिल्या जातात. मात्र, पोलीस जमादार जगन पवार यांनी आरोपींना घरचे जेवण तसेच फॅनची सुविधा बेकायदेशीररीत्या उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. तसेच आरोपींशी साध्या वेशात संपर्क साधल्याचाही आरोप आहे.

तपासिक अंमलदार किंवा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय कोठडीतील आरोपींना इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू देऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे. पोलीस दलाची शिस्त व पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या गैरप्रकारांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

या प्रकरणाची पडताळणी कुंदनकुमार वाघमारे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केली. त्यानंतर त्यांनी सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. अहवालाच्या आधारे डॉ. नीलाभ रोहन यांनी पोलीस जमादार जगन माणिक पवार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.


No comments:

Post a Comment