खरीप पूर्वीच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर



खत, बि बियाणे महागाईचा फटका: खरिप तोंडावर डिझेलचा दुष्काळ


प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

  कळमनुरी यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर कळमनुरी तालुक्यातील शेतकरी अनेक संकटाच्या विळख्यात सापडला आहे. एप्रिलपासून सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शेती मशागत कामावर विपरीत परिणाम होत आहे, दुसरीकडे बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीच्या खर्चात वाढ झाली, खरिपाच्या तोंडावर डिझेलचा दुष्काळ झाला सकाळपासून पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना, ट्रक्टर चालकांना डिझेल करता रांगा लावाव्या लागत आहे, मर्यादित पुरवठ्याने शेतकरी हवालदिल झाला, ट्रक्टरद्वारे होणाऱ्या नांगरणी, सरी, रोटावेटर कामे खोळंबली आहे आणि मशागतीच्या खर्चात वाढ झाल्याने अगामी पेरणी नियोजनावर परिणाम दिसून येत आहे.

कळमनुरी तालुक्यात सन २०२६-२७खरीप हंगामात ७५ हजार १७८ हेक्टर प्रस्तावित पेरणी आहे. शेतकऱ्यांनी लग्न सराई आटोपून रब्बी हंगामातील पिके काढणीनंतर खरीप हंगाम करता शेती तयार करण्यात शेतकरी गुंतले आहे. एप्रिल पासून बहुतांश भागात तापमान चाळीशी पार राहत आहे. उष्णतेमुळे जमीनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला असून, उष्णतेचा परिणाम मशागत कामावर होत आहे.

डिझेलचा तुटवडा ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईचे संकट गडद झाल्याने बहुतांश भागात कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून बैलजोडी कमी झालेल्या आहेत याऐवजी ट्रक्टरने मशागत कामे कमी वेळात उरकून घेतली जातात परंतु डिझेलअभावी कामे ठप्प झाली वेळेवर नांगरणी, मशागत कामे होईना, इंधन दरवाढ, वेळेवर इंधन मिळेना यामुळे यावर्षी नांगरणी व इतर मशागत दर वाढते आहे. अनेक भागात यंदा नांगरणी, सरी, रोटावेटर, कामाच्या दरात प्रति एकरी शंभर ते तिन चारशे वाढ झाली आहे अस शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे सध्या तासनतास डिझेल करता पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहयचे आणि नंतर डिझेल मिळते तेवढे काम करायचे अशी स्थिती निर्माण झाली आहे. रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भर पडली आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. युरिया व डीएपी खंताचे दर स्थिर असले, तरी विविध एनपीके खतांच्या दरात १००ते ५०० रूपयापर्यंत वाढ झाली आहे. 

उपलब्ध दरपत्रक माहीतीनुसार, युरीयाचा दर प्रति गोणी २६६ रूपयवडीएपी खत १३५० रुपयावर स्थिर आहे. मात्र म्युरेट ऑफ पोटेश (एमओपी) खतांचा दर १५५० रुपयावरुन १९७५ ते २१०० रूपय पोहचला आहे. एमएसपी खतामध्येही ५५० रुपयावरुन ६०० ते ६४० रूपयापर्यंत वाढ झाली आहे. एनपीके खतांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून येते. २४-२४-०० या खतांचा दर १९०० रुपयावरुन २२०० झाला आहे. २८- २८-०० खत १७५० रुपयावरून २२५० रूपये, तर १४-३५-१४ खतामध्ये ५०० रूपयाची वाढ झाली आहे. १५-१५ १५ खत १६५० रुपयावरुन थेट २०२५ रुपयावर गेले तर २०-२०-०० (१३) खत १४७५ वरून १८०० रुपयापर्यंत वाढले आहे. वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळे दर आहे अशी माहिती मिळाली. खत उत्पादक कंपन्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चामाल दरवाढ, इंधन दरवाढ वाहतूक खतांच्या दरात वाढ झाली आहे. खर्च आणि आयात खर्च वाढल्याने दरवाढ झाली असल्याचे सांगितले जाते. आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर खत, इंधन दरवाढ झाली आहे.

बैलजोडीस आला भाव ऐन खरीप तोंडावर डिझेलअभावी ट्रक्टरद्वारे होणाऱ्या नांगरणी व शेती मशागत कामे खोळंबली आहे, दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे ते शेतकरी परंपरागत पद्धतीने शेती नांगरणी व मशागत कामे उरकून घेत आहेत तसेच बरेच शेतकरी आपली मशागत कामे आटोपून दुसऱ्या शेतकऱ्यांना एकरी दर आकारून बैलजोडी माध्यमातून नांगरणी मशागत कामे करून देत आहे यामुळे इंधन टंचाई काळात जुन्या परंपरागत बैलजोडीस 'भाव' आला आहे अस चित्र बघायला मिळते.

कृषी विभाग म्हणते: दरम्यान कळमनुरी तालुक्यात खरीप हंगाम करता अपेक्षित बि बियाणे साठा उपलब्ध असुन नियोजित पेरणी क्षेत्रापेक्षा २५ टक्के अधिक बियाणे सध्या उपलब्ध आहेत अस तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव यांनी  प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

खरीप परीक्षा बघणार यंदाच्या खरीपावर कमी पावसाचे सावट आहे कारण हवामान विभाग अंदाज कमी पाऊस होणार आहे असे भाकीत वर्तवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी गावस्तरावर शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.



No comments:

Post a Comment